सुंदर गाव स्पर्धेच्या प्रमाणपत्रावर आबांचे नावच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:41+5:302021-03-04T05:05:41+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने स्व. आर. आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्काराचे त्यांच्या स्मृतिदिनी नुकतेच वितरण झाले. मात्र, सुंदर गावांना ...

सुंदर गाव स्पर्धेच्या प्रमाणपत्रावर आबांचे नावच नाही
जिल्हा परिषदेच्या वतीने स्व. आर. आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्काराचे त्यांच्या स्मृतिदिनी नुकतेच वितरण झाले. मात्र, सुंदर गावांना वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात आबांच्या नावाचा साधा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे आबांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
गृहमंत्रिपदावर असताना आर. आर. आबा यांनी धडाकेबाज निर्णय घेतले हाेते. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने स्व. आर. आर. आबा पाटील सुंदर ग्राम योजना पुरस्कार राबवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, त्यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या पुरस्काराच्या प्रशस्तिपत्रावर त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. त्यांचे छायाचित्रही नाही. आबांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या प्रमाणपत्रावर त्यांचा उल्लेख नसल्याने राज्य शासनाला त्यांच्या नावाचा विटाळ आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेमार्फत आर. आर. आबांच्या स्मृतिदिनानिमित्त मोठ्या थाटात सुंदर गाव पुरस्कार वितरण करण्यात आले. मात्र, पुरस्काराच्या साहित्यात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या प्रशस्तिपत्रावर त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाने यापुढे तरी झालेली चूक सुधारावी, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. तालुकास्तरावर प्रथम पुरस्कारासाठी दहा लाख रुपयांचे बक्षीस असून, पुरस्कारप्राप्त गावांना तूर्त प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.