शेती व्यवसाय झाला तोट्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:35 IST2021-01-25T04:35:37+5:302021-01-25T04:35:37+5:30
शेतकऱ्यांना सतत अस्मानी व सुल्तानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. खरीपातील मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात ...

शेती व्यवसाय झाला तोट्याचा
शेतकऱ्यांना सतत अस्मानी व सुल्तानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. खरीपातील मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर सोयाबीन, कापूस या पिकातही शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. खरीप हंगामात झालेले नुकसान पाहता, शेतकऱ्यांना तूर व रबी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु तूर पिकातही पाहिजे त्याप्रमाणात झडती आलेली नाही. तुरीचे एकरी उत्पादन अडीच ते तीन क्विंटल होत आहे.
तूर या पिकावर शेतकऱ्यांची मदार अवलंबून होती. त्यानंतर समोर पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकावरसुद्धा एक आशा होती. परंतु मोठ्या प्रमाणात अळीच्या प्रादुर्भाव होऊन कपाशी पिकात शेतकऱ्यांना नुकसानच झाले. आतापर्यंत आगोदरच्या विविध पिकात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अनेक संकटाने शेतकरी दिवसेंदिवस शेतीपासून दुरावत जाताना दिसत आहे.
रबीचे उत्पादन वाढविण्याची धडपड
यावर्षी परिसरात रबी हंगामातील गहू व हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीला गहू व हरभरा पीक चांगले बहरले होते. परंतु मध्यंतरी ढगाळ हवामानामुळे या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला. पाण्याची व्यवस्था असलेला शेतकरी यावर्षी रबी हंगामातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे.