कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST2021-03-14T04:30:45+5:302021-03-14T04:30:45+5:30
जिल्हा बँकेला गेल्या पाच वर्षांपूर्वी केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डने मदत केल्यानंतर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. ...

कर्जभरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पीककर्ज
जिल्हा बँकेला गेल्या पाच वर्षांपूर्वी केंद्र, राज्य शासन आणि नाबार्डने मदत केल्यानंतर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. त्यातच बँकेमध्ये गुंतवणूकही झाली असून बँकेने शेअर्सद्वारा भांडवल उभारणीस प्रारंभ केला आहे. परिणामस्वरूप सुरक्षित कर्जवाटपास जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रारंभ केला आहे. बँकेचे सीआरएआरचे प्रमाणही आता १७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
त्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी जिल्हा बँकेच्या ७० शाखांद्वारे ७२ कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप केले होते. अग्रणी बँकेने ६२ कोटींचे उद्दिष्ट दिले असता जिल्हा बँकेने ७२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले होते. एकूण उद्दिष्टांच्या १६ टक्के अधिक पीककर्ज बँकेने वाटप केले आहे.
त्यानुषंगाने जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीककर्जाचा ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांनी भरणा केल्यास त्यांना जिल्हा बँक वाढीव पीककर्जदराने नवीन कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी सांगितले. गेल्यावर्षी ४७ ग्रामीण शाखा आणि २३ सेमी अर्बन भागातील शाखांद्वारे जिल्हा बँकेने हे पीककर्ज वाटप केले होते. परिणामी आगामी आर्थिक वर्षात जिल्हा बँक शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज देण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहे.