दोन हजारांची लाच घेताना कृषी सहायकास अटक
By Admin | Updated: March 25, 2017 02:36 IST2017-03-25T02:36:54+5:302017-03-25T02:36:54+5:30
शेततळ्याचे माप, नोंदणीसाठी केली होती पैशांची मागणी

दोन हजारांची लाच घेताना कृषी सहायकास अटक
संग्रामपूर(बुलडाणा), दि. २४- शेततळ्याचे माप व नोंदणीसाठी दोन हजार रुपयांची लाच मागणार्या संग्रामपूर येथील कृषी कार्यालयातील कृषी सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ मार्च रोजी दुपारी रंगेहात पकडले.
संग्रामपूर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पंचासमक्ष दोन हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने कृषी सहायक अशोक चिंधाजी नांदवे यांच्या विरोधात ही कारवाई केली. तामगाव येथील अनिल मुरलीधर घिवे यांचे तामगाव शेतशिवारात गट नं. १४ मध्ये ५ एकर शेत असून, त्यांनी कृषी विभागांतर्गत मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत त्यांच्या शेतामध्ये २५ बाय २0 बाय ३ चे शेततळे मंजूर झाले होते. त्यानंतर त्यांनी शेतात शेततळे खोदून ३१ डिसेंबरला शेततळ्याचे खोदकाम पूर्ण केले. त्यानंतर शेतकरी अनिल घिवे हे शेततळ्याची मापे व नोंदणीसाठी कृषी सहायक नांदवे यांच्याकडे गेले असता, कृषी सहायक अशोक चिंधाजी नांदवे हे शेतकरी अनिल घिवे यांना शेततळ्याचे मापे व नोंदणीसाठी तीन हजार रुपयांची मागणी करीत होते. दरम्यान, तडजोडीअंती शेततळ्याची मापे व नोंदणीसाठी सहायक नांदवे यानी दोन हजारांची लाच मागितली. याप्रकरणी शेतकरी घिवे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने २४ मार्च रोजी सापळा रचण्यात येऊन कृषी कार्यालयातील कृषी सहायक नांदवे याने संबंधित शेतकर्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना कृषी सहायक नांदवे याला दुपारी रंगेहात अटक केली. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.