अंढेरा (जि. बुलढाणा) : शून्य झालो आणि शून्य सोडून जात आहे, या शब्दांत हतबलता व्यक्त करीत, राज्य शासनाने युवा शेतकरी पुरस्कार देऊन गौरविलेल्या तरुण शेतकऱ्याने ऐन होळीच्या दिवशी गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतीसाठी पाणी मिळविण्याकरिता सातत्याने लढा देत असलेल्या कैलास नागरे (वय ४४) यांनी परिस्थितीपुढे हात टेकत मृत्यूला जवळ केले. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारच्या कृषी क्षेत्रासंदर्भातील अनास्थेची चिरफाड केली आहे.
शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील कैलास नागरे हे खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी हमीसाठी लढा देत होते. खडकपूर्णाचे पाणी शिवणी अरमाळ धरणात आणत बारमाही सिंचनाची व्यवस्था व्हावी, या मागणीसाठी त्यांनी डिसेंबरमध्ये सात दिवसांचे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर २६ जानेवारी रोजी त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता; मात्र पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित केले होते.
शासनाने शिवणी अरमाळ प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; परंतु खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडण्याबाबत ठोस भूमिका घेतली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेपायी अखेर कैलास नागरे यांनी शेतातच जीवन संपवले.
संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला. प्रशासनाने ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकरी ठाम राहिले. आमदार मनोज कायंदे यांनी पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी नागरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
'शेती आहुती मागतेय!' सुसाइड नोटमधील हृदयद्रावक मजकूर
आत्महत्या करण्यापूर्वी कैलास नागरे यांनी लिहिलेली तीन पानांची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडली. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांना उद्देशून त्यांनी ही चिठ्ठी लिहिली आहे.
या चिठ्ठीत कैलास यांनी म्हटले आहे की, 'ही शेती आहुती मागतेय. कृपया पंचक्रोशीत पाणी हमी द्या. हमी पाणी हेच जीवन; अन्यथा शेतकरी स्पर्धेतून बाद होतो. मला वादा करा, काहीही करा; पण माझ्या पंचक्रोशीत शेतीला पाणी हमी द्या!'