बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:44 IST2018-06-17T23:44:41+5:302018-06-17T23:44:51+5:30
चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासोबतच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरी : चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे गोठ्यात बांधून असलेल्या शेळी व बोकडावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासोबतच रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास भेंडी तोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरही बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले.
खुटाळा येथील रहिवासी गुलाब शेंडे यांच्याकडे स्वत:च्या मालकीच्या १२ शेळ्या व दोन बोकड आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री घरालगतच्या गोठ्यात शेळ्यांना बांधून ठेवले होते. सकाळी गोठ्याची साफसफाई करण्यासाठी गेले असता, एक शेळी व बोकड मृतावस्थेत आढळून आले. बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले होते. यात त्यांचे जवळपास १४ हजारांचे नुकसान झाले आहे. लगेच वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मोका चौकशी करून पंचनामा केला. दरम्यान, रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नारायण गुरुनुले हे गावालगतच्या शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुचे शेतकरी धावून आले.
त्यामुळे बिबट्याने पळ काढला. यात नारायण जखमी झाले. लगेच त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले आहे. वनविभागाकडून तत्काळ तात्पुरती एक हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यावेळी क्षेत्र सहायक खोब्रागडे, पुसतोडे, सोनुले, मसराम उपस्थित होते.