खामगाव नगरपालिकेतील कर विभागात बनावट पावतीचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 14:29 IST2018-09-26T14:28:56+5:302018-09-26T14:29:35+5:30
खामगाव : स्थानिक नगर पालिकेतील पाणी पुरवठा विभागातील बनावट पावत्यांचे प्रकरण निस्तरत नाही तोच, आता कर विभागातील बनावट पावतीचा घोळ उघडकीस आला.

खामगाव नगरपालिकेतील कर विभागात बनावट पावतीचा घोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक नगर पालिकेतील पाणी पुरवठा विभागातील बनावट पावत्यांचे प्रकरण निस्तरत नाही तोच, आता कर विभागातील बनावट पावतीचा घोळ उघडकीस आला. याप्रकारामुळे पालिकेत खळबळ उडाली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिस कारवाईचाही प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते.
शेगाव रोडवरील ग्रामीण भागाच्या हद्दीत असलेले हॉटेल पॅराडाईज नगर पालिका हद्दीत दाखवून कर विभागात बनावट पावती तयार करण्यात आली. पालिकेतील कर आकारणी कंत्राटदाराचा सर्वेअर असलेल्या सतीश बोचरे आणि कामाला असलेल्या ऋषी पवार यांनी हा गंभीर प्रकार केल्याचे उघडकीस आले. १८ सप्टेंब ते २१ सप्टेंबरच्या कालावधीत हा प्रकार करण्यात आला. यामध्ये १८ सप्टेंबर रोजी नोंद तर १९ सप्टेंबर रोजी पावतीची प्रिन्ट काढण्यात आली. त्यानंतर खामगाव पालिकेत हॉटेल पॅराडाईजच्या मालमत्तेच्या नोंदीसाठी ३४ हजार १०० रुपयांचा भरणा करण्यात आला. यासाठी १९ सप्टेंबर २०१८ रोजी पावती क्रं. एएस-२५१६ या प्रमाणे बनविण्यात आली. दरम्यान, कर आकारणी कंत्राटदाराकडे कामाला असलेला पवार याने पूर्वी पालिकेच्या कर विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा दिल्याची माहिती समोर आली आहे.
नळ जोडणीच्या बनावट पावत्यांचे प्रकरण थंडबस्त्यात!
कर विभागातील बनावट पावतीचे प्रकरण चव्हाट्यावर येण्यापूर्वी खामगाव पालिकेत पाणी पुरवठा विभागात बनावट पावत्यांचा प्रकार घडला होता. अवैध नळ जोडणीसाठी कोºया कागदावर नगर पालिकेच्या शिक्क्यांचा वापर करण्यात आला. याप्रकरणी कारवाई थंडबस्त्यात असतानाच, तर आता कर विभागाच्या कर्मचारी संगणकाचा युजर आयडी वापरुन ३४ हजार १०० रुपयांची रक्कम घेउन परस्पर पावती देण्यात आली.
कर विभागात बनावट पावतीच्या आधारे एका मालमत्तेची नोंद करण्यात आली. ही नोंद चुकीने आणि लबाडीने करण्यात आली. याबाबत दोघांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.
कर विभागाच्या बनावट पावती प्रकरणाशी आपला काहीही एक संबध नाही. याप्रकरणी कोणत्याही चौकशीस आणि कारवाईस सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. पावती रद्द करण्यात आल्याची निविदा वृत्तपत्रात प्रकाशित केली आहे.
- एस.के. देशमुख, सहा. कर अधीक्षक, नगर परिषद, खामगाव.