बनावट ओळखपत्र देणारी टोळी सक्रिय

By Admin | Updated: October 15, 2015 00:21 IST2015-10-15T00:21:13+5:302015-10-15T00:21:13+5:30

मेहकर आगाराला दरमहा लाखो रुपयांचा फटका.

Fake identity cards are active | बनावट ओळखपत्र देणारी टोळी सक्रिय

बनावट ओळखपत्र देणारी टोळी सक्रिय

उद्धव फंगाळ / मेहकर (जि. बुलडाणा) : बनावट ओळखपत्राचा उपयोग करुन एसटी बसने प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेहकर तालुक्यात असे बनावट ओळखपत्र तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली असून, यामुळे मेहकर आगाराला दरमहा लाखो रुपयांचा फटका बसत आहे. शासनाने अपंग, वयोवृद्ध, अंध अशा लोकांसाठी विविध सवलती देऊन एसटी महामंडळाकडून त्याचा लाभ देण्यात येत आहे. एस.टी. प्रवास भाड्यामध्ये अशा लोकांना आर्थिक सुट मिळत असल्याने ही सवलत फादेशीर असली तरी पण काही लोकांनी गैरमार्गाने याचा उपयोग करुन आपला व्यवसाय बनवला आहे. एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळावी, यासाठी नियमात बसत नसतानाही आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातूनही सवलत मिळविण्याचा अनेकांनी सपाटा लावला आहे. बनावट ओळखपत्र तयार करुन देणारी टोळी शहरात गेल्या अनेक दिवसापासून सक्रिय आहे. सवलत मिळण्यासाठी अंध, अपंग, वयोवृद्ध, कर्णबधीर नसतांनाही काही जण पैसे देऊन बनावट ओळखपत्र तयार करुन घेतात. त्यासाठी संबंधीत व्यक्तीला २ ते ५ हजार रुपये देऊन बनावट ओळखपत्र तयार करुन घेतात व त्यानंतर त्या बनावट ओळखपत्रावर एस.टी.प्रवास करण्यात येतो. अशा बनावट ओळखपत्रामुळे मेहकर एस.टी.आगाराला दरमहा लाखो रुपयाचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. बनावट ओळखपत्र आढळून आल्यास ते तात्काळ जप्त करावे, अशा सूचना सर्व वाहकांना देण्यात आल्या असल्याचे मेहकर येथील आगार व्यवस्थापक चंद्रकांत पाथरकर यांनी सांगीतले.

*कारवाई करण्याची गरज

       बनावट ओळखपत्र तयार करुन त्या ओळखपत्रावर एसटीने प्रवास करण्याचा गोरखधंदा मेहकर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. असा बनावट प्रवास करताना जर कोणी आढळून आले, तर त्या व्यक्तीचे फक्त बनावट ओळखपत्र जप्त करण्यात येते. त्याचेवर कोणतीच कठोर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे हा गोरखधंदा असाच पुढे सुरु राहतो. त्यामुळे सवलतीचा गैरफायदा घेणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख संदीप तट्टे, प्रवीण पाटील लहाने, सागर कडभणे, हर्षल कुसळकर, विवेक देशमुख, मनोज जाधवसह आदींनी केली आहे.

Web Title: Fake identity cards are active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.