जुने गावातील गणपती संस्थान भाविकांचे आस्थास्थान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:53+5:302021-09-12T04:39:53+5:30

चिखली : सुमारे १६० वर्षांपूर्वी स्व. मदन व्यवहारे यांच्या घराच्या बांधकामादरम्यान गणपतीची मूर्ती अकस्मात प्रकट झाली. रिद्धी, सिद्धीचा दाता ...

Faith of Ganpati Sansthan devotees in old village! | जुने गावातील गणपती संस्थान भाविकांचे आस्थास्थान !

जुने गावातील गणपती संस्थान भाविकांचे आस्थास्थान !

चिखली : सुमारे १६० वर्षांपूर्वी स्व. मदन व्यवहारे यांच्या घराच्या बांधकामादरम्यान गणपतीची मूर्ती अकस्मात प्रकट झाली. रिद्धी, सिद्धीचा दाता प्रथमेश गजानन अवतीर्ण झाल्याचे पाहून व्यवहारे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सधन परिस्थिती असलेल्या मदन सावजी (व्यवहारे) यांनी गणेशमूर्तीच्या प्रकटीकरणानिमित्त मोठा दानधर्म केला. अन्नदान केले. त्यानंतर विधिवत पद्धतीने या मूर्तीची मंदिर बांधून स्थापना करण्यात आली.

अष्टविनायकासदृश सिंदूरचर्चित मंगलमूर्तीची प्रतिमा भाविकांचे मन मोहून टाकते. जागृत देवस्थान असलेला हा गणपती भक्तांच्या मनोकामना अवश्य पूर्ण करतो. दररोज सकाळ-संध्याकाळ ‘श्रीं’चे शास्त्रोक्त पूजन केले जाते. कार्तिक महिन्यात काकड आरती, दहीहंडी, श्री गणेश जयंती असे नैमित्तिक धार्मिक विधी व उत्सव प्रथा-परंपरेनुसार पार पाडले जातात. आजवर हजारो भाविकांनी याची प्रचिती घेतली आहे. जुन्या शहरात वास करणारा हा स्वयंभू वरदविनायक हजारो भाविकांचे आस्थाकेंद्र बनला आहे. सध्या गणेशोत्सव असल्याने मंदिर बंद असले तरी दर्शनासाठी शहर व परिसरातील अनेक भक्तजन येत आहेत. काही वर्षांपूर्वी संस्थानच्या विश्वस्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून अतिशय सुंदर अशा मंदिराची निर्मिती केली आहे. मंदिरासमोर संस्थेचे मंगलकार्यालय आहे. सर्वसामान्य जनतेला लग्न तसेच इतर कायार्साठी ते मंगल कार्यालय अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येते. दर चतुर्थीला वेगवेगळ्या पदार्थांचा गणपतीला नैवेद्य दाखवला जातो व प्रसादाचे भाविकांना प्रसाद मंडळातर्फे वाटप करण्यात येते़

दानातून महाप्रसादाचे वितरण

प्रसाद मंदिराच्या खर्चातून न बनविता काही भाविक भक्तांच्या देणगीच्या मदतीने बनविला जातो. सद्यस्थितीत या गणपती संस्थानचे अध्यक्ष दीपक महाजन, उपाध्यक्ष नंदकिशोर शेटे, सचिव दिलीप महाजन, तसेच विश्वस्त मंगेश व्यवहारे, अनुप महाजन, अनिल सावजी, रवींद्र सावजी, रवींद्र महाजन, पुरुषोत्तम गुळवे, डॉ. अरविंद सावजी, डॉ. रवींद्र सराफ आदी विश्वस्त संस्थानचे कामकाज पाहत आहेत.

Web Title: Faith of Ganpati Sansthan devotees in old village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.