भाऊबीजनिमित्त जादा बसेस
By Admin | Updated: October 24, 2014 23:22 IST2014-10-24T23:22:06+5:302014-10-24T23:22:06+5:30
बुलडाणा बसस्थानकावर गर्दी : पुणे, नाशिक, औरंगाबाद, सप्तश्रृंगीसाठी विशेष बसेस.

भाऊबीजनिमित्त जादा बसेस
बुलडाणा : दिवाळी, भाऊबीजेसाठी राज्य परिवहन महामंडळाने बुलडाणा बसस्थानकावरून प्रवाशांच्या सेवेसाठी खास १३ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक सात बसेस उद्या २५ ऑक्टोबर पुण्यासाठी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चार बसेसचे बुकींगसुद्धा पूर्ण झाल्याची माहिती स्थानक प्रमुख दीपक साळवे यांनी दिली.
दरवर्षी बुलडाणा बसस्थानकाहून दिवाळीसाठी खास जादा बसेस सोडण्यात येतात. यावर्षीसुद्धा विभागीय वाहतूक अधिकारी पृथ्वीराज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक भोसले व वाहतूक अधिकारी दीपक साळवे यांनी दिवाळीपूर्वीच प्रवासी वाहतुकीची संभाव्य गर्दी लक्षात घेता नियोजन केले. धनत्रयोदशी व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बसस्थानकावर फारशी गर्दी नसते; मात्र लक्ष्मीपूजन झाले की, वाहतुकीमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व प्रवाशांची कोठेही हेळसांड होऊ नये म्हणून बसस्थानकावर दिवसभर कर्मचार्यांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात येवून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार उद्या, २६ ऑक्टोबरला भाऊबीज असल्यामुळे बुलडाणा बसस्थानकाहून पुण्यासाठी एकूण सात बसेस सोडण्यात येणार आहेत. यापैकी ४ बसेस आगाऊ बुकींगसुद्धा झाले आहे. बुलडाणा बसस्थानकाहून जादा बसेस बुलडाणा -लातूर ७.३0 वाजता, बुलडाणा- पुसद सकाळी ७.३0 वाजता, बुलडाणा-धुळे मार्गे मलकापूर सकाळी ६.३0 वाजता, बुलडाणा-पुणे सकाळी ७.३0 वाजता, बुलडाणा -सप्तश्रृंगी सकाळी ७.१५ वाजता आणि बुलडाणा ते नाशिक दुपारी १ वाजता जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
*रोषणाईने सजले बसस्थानक
दिवाळी हंगामात प्रवाशांनी जास्तीत जास्त एस.टी.बसमधूनच प्रवास करावा, त्यासाठी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा बसस्थानकावर खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण बसस्थानकाच्या इमारतीवर लाईटींग लावून रोषणाई करण्यात आली. तर बसस्थानक परिसरात स्वागत फलक लावून तीनही दिवस रांगोळी टाकून तोरण बांधून प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्मचार्यांनी प्रवाशांना उटणे लावून अभ्यंगस्नान घातले.