मक्याची निर्यात घटली
By Admin | Updated: February 24, 2015 00:15 IST2015-02-24T00:15:42+5:302015-02-24T00:15:42+5:30
रेल्वेचे उत्पन्न घटले; मोटारमालकांसह हमालांवरही संक्रांत.

मक्याची निर्यात घटली
हनुमान जगताप /मलकापूर (जि. बुलडाणा) विदर्भ प्रवेशद्वारी व परिसरात या हंगामात पावसाने ऐनवेळी पाठ फिरविली. परिणामी मक्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे मक्याची निर्यात ६0 टक्क्यांनी घटल्याची माहिती आहे. रेल्वेला त्यात लाखो रुपयांचा तोटा झाल्याचे सांगितले जात असून वाहतूक करणार्या मोटारमालक व हमालांवर सुध्दा या दुष्काळाची संक्रांत ओढावली आहे. मलकापूर रेल्वे मालधक्क्यावरुन दरवर्षी लाखो क्विंटल मक्याची निर्यात होते. त्यातून रेल्वेला चिकार उत्पन्न होते. स्थानिक स्तरावरच्या मक्याची निर्यात देशभरासह विदेशातही होते. या प्रक्रियेत येथील ट्रकमालक व हमालांची भरपूर कमाई दरवर्षी होते. या हंगामात मलकापूर व परिसरातील भागात ऐनवेळी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. म्हणजे मक्याच्या पिकाला मोक्याच्या क्षणी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात सुमार घट झाली. परिणामी मलकापूर रेल्वे मालधक्क्यावरुन दरवर्षी होणार्या मक्याच्या निर्यातीत ६0 टक्क्यांनी घट झाली आहे. याविषयी माहिती घेतली असता दरवर्षी स्थानिक रेल्वेच्या मालधक्क्यावरुन ७२ ते ७५ रॅक निर्यात होतात. यावर्षी त्यात ६0 टक्क्यांनी घट झाली आहे. स्थानिय ट्रकमालकांचा मोठय़ा प्रमाणातील व्यवसाय त्यावर निर्भर असतो. मात्र या हंगामात त्यांच्यावर व हमालांवरही संक्रांत ओढावल्याचे चित्र आहे.