मुदतबाह्य खाद्य पदार्थांची विक्री!
By Admin | Updated: April 28, 2017 00:47 IST2017-04-28T00:47:56+5:302017-04-28T00:47:56+5:30
खामगाव : शहर व परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरुअसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये सदर प्रकार उघड झाला.

मुदतबाह्य खाद्य पदार्थांची विक्री!
नागरिकांच्या आरोग्याशी सुरु आहे खेळ
खामगाव : शहर व परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरुअसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. लोकमतने गुरुवार २७ एप्रिल रोजी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये सदर प्रकार उघड झाला.
सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये खाण्यापिण्याचे विविध पदार्थ स्वत: च्या घरी तयार करुन घ्यायला बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. महिला सुध्दा नोकरी करु लागल्याने अनेक पदार्थ हे घरी तयार करण्याऐवजी रेडीमेड विकत घेण्याकडे कल वाढलेला आहे. यात लहान मुलांच्या खाऊपासून गव्हाच्या पिठापर्यंत अनेक पदार्थ रेडीमेड व पाकिटबंद स्वरुपात विकत घेतले जातात. नागरिकांची गरज लक्षात घेता पापड, लोणचे, चटणी यासह चिवडा, शेव, पापडी, गाठीया, आलू चिप्स, असे कितीतरी खाद्यपदार्थ आज बाजारात पाकिटबंद स्वरुपात विकायला आलेले आहेत. तसेच विविध शितपेय, लहान मुलांकरिता विविध प्रकारचे चॉकलेट्स व चटकदार पदार्थ सुध्दा जागोजागी दिसतात. या खाद्यपदार्थांची मुदत निघून गेल्यावरही संबंधित विक्रेते आपले स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी ते ग्राहकांना विकून मोकळे होतात. याबाबत लोकमतच्या चमूने गुरुवारी शहरातील विविध भागात जावून काही खाद्यपदार्थांची खरेदी केली असता या प्रकारात बरेच तथ्य आढळून आले. मुदतबाह्य पदार्थांची विक्री केल्यानंतर सदर बाब लक्षात आणून दिली असता काहींनी पाकिटे बदलून दिली तर काहींनी तारीख निघून गेली तरी काही फरक पडत नाही असे म्हणून चक्क त्यास नकार दिला.
असे झाले स्टिंग आॅपरेशन
गुरुवार २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता स्टिंग आॅपरेशन करण्यासाठी लोकमतची चमू गठीत करण्यात आली. यामध्ये संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसह वार्ताहर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मिळून तीन पथक तयार करण्यात आले. या पथकांनी मेनरोडवरील काही दुकाने, बसस्थानक परिसर, नांदुरा रोड आदी भागात जावून खाद्य पदार्थांची पाहणी व प्रत्यक्ष खरेदी करुन मुदतबाह्य पदार्थ विक्री होत असल्याची खात्री केली. काही हॉटेलांमध्ये सुध्दा कित्येक दिवसाच्या शिळ्या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले.
कमवत्या महिलांचा खरेदीकडे कल
मुलांकरिता घरीच काहीतरी पौष्टीक पदार्थ तयार करुन खाऊ घालायला कमवत्या महिलांकडे वेळ नाही. त्यामुळे अशी खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. परंतु असे खाद्यपदार्थ जास्त काळ सुस्थितीत राहत नाहीत. त्यांची मुदत ( एक्सपायरी डेट) फार कमी असते. बरेचदा ती निघून गेल्यावरही उत्पादक आणि दुकानदार आपले नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांना विकून मोकळे होतात. यात मुदतीकडे लक्ष न देणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर त्याचा नकळत विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तयार खाद्यपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.