जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:33+5:302021-09-13T04:33:33+5:30

साखरखेर्डा : बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्हा ...

Everyone should get vaccinated to make the district corona free: Guardian Minister | जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी : पालकमंत्री

जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी लस घ्यावी : पालकमंत्री

साखरखेर्डा : बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि तिसरी लाट येण्यापूर्वी जिल्हा कोरोनामुक्त करावा, असे आवाहन औषध व अन्न प्रशासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साखरखेर्डा येथे पत्रकार परिषदेत केले.

बुलडाणा जिल्ह्यात २१ लाख ९९ हजार ८६२ नागरिक १८ वर्षांवरील आहेत. या सर्वांना येत्या दोन महिन्यांत कोविड-१९ची लस देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १७ हजार ७९४ आरोग्य कर्मचारी असून, १६ हजार ८७९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांची टक्केवारी ९४.८६ आहे. त्यानंतर शासनाने फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना ( कोरोनायोद्धा ) प्राधान्य दिले. फ्रन्टलाइनमधील ३५ हजार ९७९ कर्मचाऱ्यांपैकी ३५ हजार ५९७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यांची टक्केवारी ९८.९४ आहे. १८ ते ४४ वयांतील नागरिकांची संख्या १२ लाख ५६ हजार ८२७ असून, त्यापैकी २ लाख ८९ हजार ५६२ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे. त्यांची टक्केवारी २३.०४ आहे. ४५ वर्षांवरील ८ लाख ८९ हजार २६५ नागरिकांपैकी ३ लाख ८८ हजार ६३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यांची टक्केवारी ४३.७० आहे. २१ लाख ९९ हजार ८६५ नागरिकांपैकी ७ लाख ३० हजार ६७१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आज ३३.२१ टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.

काेविशिल्डचे ५७ हजार डाेस उपलब्ध

जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा साठा ५७ हजार डोस आणि कोव्हॅक्सिनचा साठा २३ हजार १५० आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल .

बुलडाणा जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप केंद्रात, उपजिल्हा रुग्णालयात, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा ज्या ज्या ठिकाणी केंद्र सुरू करता येतील त्या त्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी नागरिकांनी सजग राहून आपले लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष लसीकरण शिबिरांना प्रतिसाद

साखरखेर्डा, शेंदुर्जन, दुसरबीड, सिंदखेडराजा येथे लसीकरण शिबिर सुरू असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र कुमार साळवे, माजी कृषी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख, गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, माजी उपसभापती सुनील जगताप उपस्थित होते.

Web Title: Everyone should get vaccinated to make the district corona free: Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.