माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:40+5:302021-07-16T04:24:40+5:30
हिंदू कालगणनेनुसार वर्षाचा चौथा महिना आषाढ असतो. पावसाळ्याचे आगमन आषाढ महिन्यातच होते. या महिन्यातील महत्त्वपूर्ण पहिल्या सणाला नवविवाहिता माहेरी ...

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा!
हिंदू कालगणनेनुसार वर्षाचा चौथा महिना आषाढ असतो. पावसाळ्याचे आगमन आषाढ महिन्यातच होते. या महिन्यातील महत्त्वपूर्ण पहिल्या सणाला नवविवाहिता माहेरी जाण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. उन्हाळ्यात लग्न होऊन सासरी गेलेल्या नवविवाहितेला पावसाळा लागताच माहेरी जाण्याचे वेध लागतात. आई, बाबा, भाऊ, बहीण, काका, काकू यांच्या आठवणीत त्या आपला प्रत्येक दिवस घालवीत आषाढ महिन्याची वाट बघतात. परंतु, यंदा कोरोनामुळे नवविवाहितांची माहेराची वाटही अडविल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आषाढीला माहेरी जाण्याची वाट यंदा कोरोनाने रोखली आहे. त्यामुळे सासरी आलेल्या मुलींना यंदा माहेरी येता येणार नसल्याचे चित्र आहे.
नवविवाहित मुलीच्या आईच्या भावना
विवाहानंतर सासरी गेलेल्या मुलीला आषाढामध्ये माहेरी आणण्याची प्रथा आहे. परंतु, कोरोनामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत करून ठेवले आहे. त्यामुळे एवढे वर्ष माहेरी न येता, प्रत्येक मुलीने आपल्या सासरलाच माहेर करून त्याठिकाणीच सण, उत्सव साजरे करणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, प्रत्येकाने घरात राहून काळजी घेणे आज गरजेचे झालेले आहे.
काय म्हणतात नवविवाहिता...
पहिल्या सणाला माहेरी जाण्याची ओढ प्रत्येक विवाहितेला असते. प्रत्येकीच्या मनात माहेरी जाण्याची प्रचंड उत्सुकता असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाहेर गावी जाणे टाळणे आणि घरी थांबणे हेच महत्त्वाचे आहे. माझे सासरच माझे माहेर झाले आहे.
जयश्री गौरव देशमुख.
कोरोनामुळे यंदा मुलींना पहिल्या सणाला माहेरी जाता येत नाही. माहेरी जाण्याची प्रत्येक नवविवाहिता आतुरतेने वाट पाहते. परंतु, यंदा कोरोनामुळे बाहेर न पडणेच योग्य आहे.
मंगला राम गवरकर.