शासनाने सर्व क्षेत्रातील निर्बंध शिथिल केले. परंतू, अद्यापपर्यंत सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंदच आहेत. राज्य सरकारने भाविकांसाठी प्रार्थनास्थळे खुली करावी, या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष सिताराम महाराज ठोकळ, माजी आमदार विजयराज शिंदे आणि भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दिंडी मोर्चा काढण्यात आला. टाळ, मृदंग, वीणा हाती घेऊन अंगभ आणि भजन म्हणत शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापृष्ठभूमीवर ॲड.सुनील देशमुख यांनी राज्य सरकारने सर्वच क्षेत्रात आता सूट दिली आहे. एकीकडे वाईन बार, हॉटेल्स सुरु आहेत. दुसरीकडे सर्व राजकीय मेळावे, सभा आणि मोठमोठ्या रॅल्या काढल्या जात आहे. यामध्ये कोरोनाचा संसर्ग होत नाही आणि केवळ मंदिरे व प्रार्थना स्थळांमध्येच कोरोनाचा संसर्ग होतो का, असा सवाल उपस्थित केला आहे. दारूची दुकाने सुरु ठेवायला हरकत नाही; मग प्रार्थनास्थळे सुरु ठेवण्यावरच बंदी का? राज्य सरकारने सर्वधर्मिय नागरिकांच्या भावना आणि श्रद्धेचा आदर करत सर्व प्रार्थनालये, मंदिरे सुरु करावी, अन्यथा आणखी शंभर गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, यापुढेही देवालये सुरु करण्यासाठी आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.सुनील देशमुख यांनी सांगितले आहे.
देवालये सुरु करण्यासाठी आणखी शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील : ॲड.सुनील देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST