महसूल विभागाच्या आकृतिबंधात सुधारणेसाठी अभ्यासगट स्थापन
By Admin | Updated: February 11, 2015 23:57 IST2015-02-11T23:57:00+5:302015-02-11T23:57:00+5:30
जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांचा समावेश.

महसूल विभागाच्या आकृतिबंधात सुधारणेसाठी अभ्यासगट स्थापन
बुलडाणा : राज्यातील महसूल विभागातील विविध कार्यालयांमध्ये सुधारणांच्या अनुषंगाने राज्य शासनाने महसूल विभागाच्या आकृतिबंधाचा अभ्यास करण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या या अभ्यासगटात जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासगटाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबादचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगड यांची नियुक्ती केली असून, सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नांदेडचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, औरंगाबाद येथील महसूल आयुक्तालयातील उपजिल्हाधिकारी शिवाजी इशंदे, यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आणि औरंगाबाद महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर आदींचा समावेश आहे. राज्यातील लहान, मध्यम व मोठय़ा जिल्ह्यांतील तालुके, उपविभाग व जिल्हा कार्यालय यांच्या आकृतिबंधाचा अभ्यास करून व महसूल यंत्रणेकडील सध्याच्या कामाचा ताण विचारात घेऊन, सध्या अशा कार्यालयांसाठी मंजूर आकृतिबंधात सुयोग्य सुधारणा करण्यासाठी तसेच उपलब्ध मनुष्यबळाचे फेरवाटप करणे व आवश्यतेनुसार किमान पदनिर्मितीची गरज निश्चित करण्यासाठी हा अभ्यासगट स्थापन केला आहे.