शंकांचे निरसन करण्यास ‘ईएसआयसी’कडून टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 11:36 IST2021-04-08T11:35:46+5:302021-04-08T11:36:01+5:30
ESIC Avoid to resolving doubts शंकांचे निरसन करायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

शंकांचे निरसन करण्यास ‘ईएसआयसी’कडून टाळाटाळ
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी स्थानिक ईएसआयसी कार्यालयात टाळाटाळ करण्यात येते. यासंदर्भात माहितीचे अधिकार नागपूर कार्यालयाला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, नागपूर येथील ईएसआयसी कार्यालयातील दुरध्वनी सतत व्यस्त येत असून संपर्क न होऊ शकल्याने आपल्या शंकांचे निरसन करायचे तरी कसे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्यासाठी ईएसआयसी कार्यालय शासकीय स्तरावर कार्यरत आहेत. याकरिता विदर्भात नागपूर या मुख्य कार्यालयांतर्गत जिल्हास्तरीय कार्यालय सुरू आहेत. या कार्यालयात खासगी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांच्या लाभासाठी कागदपत्रे स्वीकारण्यात येतात. यासंदर्भातील माहितीही या कार्यालयात उपलब्ध आहे. मात्र, या योजनेविषयी इतर महत्त्वाची माहिती किंवा आकडेवारी हवी असल्यास या कार्यालयातून दिल्या जात नाही. याकरिता नागपूर येथील ईएसआयसी या मुख्य कार्यालयाचा दुरध्वनी नंबर ऑनलाइन प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात येतात.
प्रत्यक्षात मात्र या ऑनलाइन संकेतस्थळावर दर्शविण्यात आलेला लँडलाइन नंबर सतत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध योजनांच्या लाभार्थींना योग्य ते मार्गदर्शन करणे क्रमप्राप्त ठरते. वरिष्ठ कार्यालयात संपर्क होत नसेल तर संबंधित लाभार्थ्याला स्थानिक कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती स्थानिक कार्यालयातच उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.
नेमके हेच मार्गदर्शन स्थानिक पातळीवर करण्यात येत नसल्याने लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रधानमंत्री अटल बिमीत कल्याण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी आम्हाला स्थानिक पातळीवरून देता येत नाही. याकरिता नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. या कार्यालयाचा लँडलाइन क्रमांक ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- विवेक शेगावकर, अधिकारी,
ईएसआयसी कार्यालय, खामगाव.