मतविभाजनाची समीकरणे
By Admin | Updated: September 28, 2014 00:26 IST2014-09-28T00:26:16+5:302014-09-28T00:26:16+5:30
बुलडाणा मतदारसंघासाठी भाजपाला मिळाला नवा चेहरा.

मतविभाजनाची समीकरणे
बुलडाणा: युती व आघाडी संपुष्टात आल्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची सं ख्या अपक्षाऐवजी पक्ष म्हणून वाढली आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगवान घडामोडी होऊन भाजपाला नवीन चेहरा उमेदवार म्हणून मिळाला. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी अशा चौरंगी लढतीला भाजपामुळे पंचरंगी असे स्वरूप आले आहे. प्रत्येक उमेदवार हा सामाजिक दृष्ट्या आपल्या उमेदवारीचा विचार अधिक करत असून, मत विभाजनाची समीकरणे मांडण्यास बुलडाण्यात सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली. विश्वास आणि विचार अशा दोन मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगून त्यांनी परिवर्तनाचा नारा दिला आहे. त्यांची लढत ही शिवसेनेचे विद्यमान आमदार विजयराज शिंदे यांच्या सोबत असून, आ. शिंदे यांनी मतदारसंघातील आपले नेटवर्क कायम ठेवत संपर्क वाढविला आहे. या दोघांमध्येच सामना रंगणार, अशी चिन्हे असतानाच युती आणि आघाडी दुभंगली त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून नरेश शेळके हे रिंगणात उतरले आहे.