गावकारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST2021-01-17T04:30:07+5:302021-01-17T04:30:07+5:30
मेहकर : शुक्रवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. महिला व पुरुष मतदार आपला मतदानाचा ...

गावकारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह
मेहकर : शुक्रवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. महिला व पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १४२ मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायतींच्या ३१३ जागांसाठी एकूण ७४९ उमेदवार रिंगणात होते.
मेहकर तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सर्वात्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. गल्लीतील पत या निवडणुकीवर अवलंबून असल्यामुळे गावपुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसून आले. मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ८०.९५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण निवडणूक म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. मतदारांनीही या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित कासारखेड, पांगरखेड मादणी, मोहना बु. मोळा, मांडवा समेत डोंगर, शेलगाव देशमुख, शेलगाव काकडे, शेंदला, घाटनांद्रा, डोणगाव, फैजलापूर, लोणी गवळी, शिवाजीनगर, विवेकानंद नगर, विश्वी, हिवरा खुर्द, देऊळगाव माळी, दे. साकर्शा, दादुलगव्हाण, आरेगाव, अंजनी बु., जवळा, वरूड, ब्रह्मपुरी, बोरी, बोथा, सारशिव, सावत्रा, सावंगीवीर, गजरखेड, गणपूर, नायगाव दत्तापूर, गोमेधर, गोहोगाव, नागापूर, कनका बु., उमरा, शहापूर या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांच्या मतदानासाठी ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे पाहावयाच मिळाले. गावचा कारभार हाती घेण्यासाठी अनेक ठिकाणी चुरस पाहावयास मिळाली. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, १८ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, तालुक्यातील अनके मतदान केंद्रांवर यांचे पालन होताना दिसून आले नाही. अनेक मतदारांनी मास्क वापरला नव्हता. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.
दिव्यांगांनी बजावला हक्क
या ग्रामपंचायत निवडणुकीत वृद्ध व आजारी असलेल्या ज्येष्ठांनी मतदानाचा हक्क बजाविला. आपल्या मतदान हक्काची कर्तव्य पूर्तता करताना कुठल्याचे प्रकारची हयगय केली नसल्याचे यावेळी दिसून आले.