जल व भूमी संधारण अभियानाला बळकटी
By Admin | Updated: April 10, 2015 23:34 IST2015-04-10T23:34:36+5:302015-04-10T23:34:36+5:30
बुलडाणा जिल्ह्यासाठी ७४ लाखांची तरतूद; ५२ गावांमध्ये कामे सुरू.

जल व भूमी संधारण अभियानाला बळकटी
नाना हिवराळे /खामगाव (जि. बुलडाणा) : महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियानांतर्गत जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये ८४ ठिकाणी माती नालाबांध व सिमेंट नालाबांध तुटफूट दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामासाठी जिल्ह्याला ७४ लाखांची तरतूद झाली असून, अभियानामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोतांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या बळकटीकरणास मदत होत आहे. राज्यातील शेतीची अवस्था कधी नव्हे इतकी बिकट झाली आहे. शेतीसाठी हवामान, पतपुरवठा तसेच बाजार यापैकी कोणतीच गोष्ट म्हणावी तशी अनुकूल नाही. या सर्व घटकांमध्ये हवामान व विशेषत: लहरी पाऊस अत्यंत महत्त्वाची भुमिका बजावत असतो. आपल्याकडील बहुतांश जमीन ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पाऊसही बेभरवशाचा झाल्याने याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर दिसून आला आहे. मोठय़ा प्रमाणावर कोरडवाहू शेती करणार्या शेतकर्यांसाठी सिंचनक्षेत्र वाढविण्यास मदत व्हावी, याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान शासनाच्यावतीने राबविणे सुरू आहे. कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन उपलब्धता वाढविणे, पडीक जमिनीचा विकास व रोजगार उपलब्धता वाढविणे, जलसाक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर झाल्याने गंभीर पाणीटंचाईवर मात करणे ही अभियानाची उद्दिष्ट्ये आहेत. सन २0१४-१५ करिता जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ८४ ठिकाणी माती नाला बांध व सिमेंट नाला बांध तुटफूट दुरुस्तीच्या कामासाठी ७४ लाख २५ हजार २८५ रुपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.