चिखली रस्त्यावरील अतिक्रमण काढले!
By Admin | Updated: December 4, 2015 02:40 IST2015-12-04T02:40:16+5:302015-12-04T02:40:16+5:30
बुलडाणा नगरपालिका प्रशासनाची कारवाई; शहरातील अंतर्गत अतिक्रमणाचा प्रश्न मात्र कायम.

चिखली रस्त्यावरील अतिक्रमण काढले!
बुलडाणा: मलकापूर सोलापूर मार्गावरील देवीचे मंदिर ते चिखली नाक्यापर्यंंत असलेले अतिक्रमण नगर पालिका प्रशासनाने अखेर हटविले. मागील पंधरा दिवसांपूर्वी धाड नाक्यावर असलेली अवैध मटन मार्केटवर पालिका प्रशासनाने बुलडोझर चालविल्यानंतर चिखली मार्गावरील मटन मार्केट आणि इतर दुकाने आज हटविण्यात आली. या संदर्भात अँड. अभय चव्हाण यांनी नागपूर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने बुलडाणा नगर पालिकेला नोटीस बजावली होती. त्यावर नगर पालिकेने तातडीने अंमलबजावणी केली. बुलडाणा शहरात कोणत्याही मार्गावरून शहरात प्रवास केला की रस्त्यावर सर्वत्र अतिक्रमण दिसून येते. या अतिक्रमाणामुळे वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिसवस वाढत चालल्या असून, वाहनचालकांना वाहने चालविणे मुष्कील होत आहे. शहरातील महत्त्वाच्या रहदारीचे चौक व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे ही मागणी वारंवार समोर येते.; मात्र राजकीय हस्तक्षेप व अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील अतिक्रमण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी धाड नाक्यावर अवैधरीत्या सुरू असलेले कत्तलखाने हटविण्यास नगरपालिकेने पाऊल उचलले होते. आता बुलडाणा शहरातून जाणार्या मलकापूर सोलापूर या महामार्गावरील अत्यंत रहदारीच्या देवीचे मंदिर ते चिखली नाका या भागातील अवैधरीत्या सुरू असलेले मटन मार्केट आणि इतर व्यावसायिकांची दुकाने हटविण्याची कारवाई नगरपालिकेने सुरू केली. यामध्ये जवळपास शंभर दुकानाचा समावेश होता. यामध्ये अवैध मटन विक्रीची दुकाने होती.