वीज रोहित्र, विद्युत तार चोरणारी टोळी जेरबंद!
By Admin | Updated: July 21, 2016 00:57 IST2016-07-21T00:57:24+5:302016-07-21T00:57:24+5:30
बुलडाणा जिल्ह्यात वीज चो-या करणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

वीज रोहित्र, विद्युत तार चोरणारी टोळी जेरबंद!
बुलडाणा : विद्युत तार ट्रान्सफार्मर तेल व त्याचे भाग इत्यादी चोरी होण्याच्या प्रकारात राज्यभरात वाढ झाल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंत व्यक्त केली होती. सदर बाब शेतकर्यांच्या अस्मितेशी संबंधित असल्यामुळे गुन्हे तत्काळ उघडकीस आणून गुन्हेगारीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार अवघ्या २४ तासांचे आत वीज ट्रान्सफार्मर तार चोरणारी टोळी जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने २0 जुलै रोजी केली.
याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती यांचे आदेशान्वये पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.प्रताप शिकारे यांच्या नेतृत्वात पोउपनि एम.एम. सैयद, एएसआय प्रकाश राठोड, राजेश ठाकूर, नंदकिशोर धांडे, रामु मुंढे, संदीप मोरे, शे.नदीम, विवेक तायडे, भारत जंगले यांनी गोपनीय माहिती काढून अमडापूर येथे नाकाबंदी करून आरोपी सैयद हमीद सैयद इमाम रा.अमडापूर यास वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे ताब्यातील वाहनामध्ये पो.स्टे. रायपूर व अहमदनगर जिल्हय़ातील चोरलेल्या ट्रान्सफार्मरचा मुद्देमाल, असा एकूण किंमती ३ लाख ७00 रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला. सदर आरोपीने बुलडाणा जिल्हय़ातील डोणगाव, जानेफळ या पो.स्टे.च्या हद्दीसह अहमदनगर जिल्हय़ातसुद्धा चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत आणखी सहआरोपी असल्याची शक्यता असल्याने पुढील तपास कार्यवाहीसाठी आरोपी व मुद्देमाल पो.स्टे.रायपूर येथे ताब्यात घेऊन अप.नं.६२/२0१६ कलम ३७९, ३४ भादंवि सहकलम १३६ भारतीय विद्युत कायद्याप्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. अशाप्रकारच्या टोळ्यांवर पोलीस लक्ष ठेवून असून, आणखी कारवाई करण्यात येणार आहे.