शासकीय कार्यालयात विजेचा गैरवापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:37 IST2017-05-04T00:37:46+5:302017-05-04T00:37:46+5:30
ग्रामीण भागात भारनियमन : कर्मचाऱ्यांऐवजी रिकाम्या खुर्च्या घेतात हवा, प्रकाश

शासकीय कार्यालयात विजेचा गैरवापर
बुलडाणा : विजेचा तुटवडा लक्षात घेता, शहरात काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. शिवाय वीज बचतीच्या उपाययोजना शासनाकडून आखल्या आहेत. मात्र, असे असतानाही शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा गैरवापर होत असून, कर्मचाऱ्यांऐवजी रिकाम्या खुर्च्या व दस्तावेज हवा व प्रकाश घेत असल्याची बाब ‘लोकमत’ने आज जागतिक ऊर्जादिनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून पुढे आली.
विजेचा अनावश्यक वापर टाळा, विजेची बचत करा, असा संदेश शासनाकडून वारंवार दिला जात असतानाही शासकीय कार्यालयातील वीज वापरावर मात्र कोणताही बदल दिसून येत नाही. विजेची बचत व्हावी, यासाठी शासनाने गावोगावी सीएफएल बल्बचा वापर आणि सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने योजना राबविल्या जात आहेत; मात्र, गावोगावी योजना राबविणाऱ्या जिल्हा यंत्रणेकडूनच विजेचा गैरवापर होताना दिसत आहे.
यासंदर्भात आज शहरात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली. सर्वच कार्यालयात व बाहेर व्हरांड्यात ४० वॅटच्या ट्युबलाइटचा वापर आढळून आला.
लख्ख उजेड असलेल्या ठिकाणी ट्युब लाइट बसविण्यात आले आहेत आणि ते दिवस-रात्र सुरू ठेवण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त कर्मचारी जागेवर नसतानाही पंखे गरगरताना दिसून आले. काही कार्यालयांमध्ये तर दोन-तीन कर्मचारी काम करताना दिसतात आणि सर्व पंखे व ट्युबलाइट सुरू असलेले दिसून आले. विशेष म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा गैरवापर होत आहे. दरमहा हजारो रुपयांचे वीज बिल प्रत्येक शासकीय कार्यालयाला भरावे लागत आहे.
प्रशासकीय इमारतीतही विजेचा अपव्यय
बुलडाणा बसस्थानकांसमोरील प्रशासकीय इमारतीत अनेक कार्यालये आहेत. या कार्यालयातही विजेचा अपव्यय होताना दिसून आला. या ठिकाणी रोजगार व स्वंयरोजगार, कामगार अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत वितरण कार्यालय, वेतन पथक आदी कार्यालये आहेत. मात्र, सर्वच कार्यालयात दिवसा विजेचा अपव्यय होताना दिसून आला. विशेष म्हणजे काही कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती.
चार कर्मचाऱ्यांसाठी दहा ट्युबलाइट
तहसील कार्यालयातील जवळपास सर्व विभागात चार ते पाच कर्मचारी काम करीत होते. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी विभागात दहा ट्युबलाइट सुरु होते. शिवाय कार्यालयात इतर अधिकारी उपस्थित नसतानाही त्यांच्या कॅबिनमध्ये पंखा व लाइट सुरु होते. शिवाय इतर विभागातील लाइट व पंखे अनावश्यकरीत्या सुरूच होते. अशीच परिस्थिती इतर कार्यालयात दिसून आली.
व्हरांड्यातील ट्युबलाइट सुरूच!
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अद्यापही वीज बचतीचे महत्त्व समजले नाही. येथील मागील बाजूला असलेल्या नवीन इमारतीत आतील व्हरांड्यातील ४० वॅट ट्यूबलाइट भरदिवसा सुरूच होता. येथून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मात्र लाइट बंद करण्याची तसदी घेतली नाही.
रिकाम्या खुर्च्यांना हवा व प्रकाश!
स्थानिक पंचायत समिती कार्यालय चकाचक करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात नवीन पंखे व ट्युबलाइट लावण्यात आले. मात्र, बऱ्याच विभागात कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित नसतानाही पंखे व दिवे सुरू होते. त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.