हाणामारीत आठ गंभीर जखमी
By Admin | Updated: August 7, 2015 01:03 IST2015-08-07T01:03:43+5:302015-08-07T01:03:43+5:30
बोरगाव काकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या उत्साहाला गालबोट.

हाणामारीत आठ गंभीर जखमी
अमडापूर (जि. बुलडाणा): ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गुरुवारी दुपारी २ वाजता जाहीर झाल्यानंतर चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील निवडणुकीच्या उत्साहाला गालबोट लागले. पराभूत पॅनलच्या काही लोकांना विजयी झालेल्या पॅनलच्या लोकांवर लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने हल्ला केल्यामुळे आठ जण गंभीर झाले. ही घटना आज ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारात घडली. सर्व जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.
चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव काकडे येथे ग्रामविकास प्रगती पॅनल विरुद्ध बळीराजा पॅनल अशा दोन पॅनलमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली गेली. गुरुवारी दुपारी जाहीर झालेल्या निकालानंतर प्रगती पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले, तर बळीराजा पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले; मात्र विजयोत्सवादरम्यान गावात वाद उफाळून आला.
दरम्यान, विजयी मिरवणुकीनंतर काही लोकांनी लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने विजयी पॅनलच्या सदस्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ग्रामविकास प्रगती पॅनलचे रमेश काकडे, बंडू काकडे, वसंतराव काकडे, गजानन काकडे, संजय काकडे, गुलाबराव काकडे, विजय काकडे, शोभा काकडे आदी जखमी झाले. यानंतर ग्रामस्थांनी सर्वांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.