शिक्षण विभागाच्या सेवाज्येष्ठता यादीत घोळ !

By Admin | Updated: July 6, 2015 02:25 IST2015-07-06T01:53:44+5:302015-07-06T02:25:48+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; अनुसूचित जातीच्या यादीत इतर प्रवर्गातील नावांचा समावेश.

Education department's list of seniority list! | शिक्षण विभागाच्या सेवाज्येष्ठता यादीत घोळ !

शिक्षण विभागाच्या सेवाज्येष्ठता यादीत घोळ !

सिद्धार्थ आराख /बुलडाणा: विस्तार अधिकारी वर्ग-३ या पदावर करावयाच्या पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नुकतीच जिल्ह्या तील पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये प्रचंड घोळ असून, अनुसूचित जातीच्या प्रवर्गात इतर प्रवर्गातील शिक्षकांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे, ही यादी शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि केंद्रप्रमुखांमधून विस्तार अधिकारी श्रेणी-३ या पदावर पदोन्नतीसाठी शिक्षण विभागाने सेवाज्येष्ठता यादी तयार केली. ही पदे भरताना सर्वसाधारणमधून ७५ टक्के, तर पदवीधरमधून २५ टक्के भरावयाची आहेत. यात खुल्या प्रवर्गातून २६, अनुसूचित जातीमधून नऊ, अनुसूचित जमातीमधून पाच, विशेष मागास प्रवर्गामधून पाच अशी भरावयाची आहेत; मात्र ही यादी तयार करताना जातनिहाय ज्या प्रवर्गातील व्यक्ती असेल, तिचा समावेश त्याच प्रवर्गात करणे आवश्यक असताना या यादीमध्ये प्रचंड घोळ करण्यात आला. अनुसूचित जाती संवर्गामध्ये चक्क कुणबी, देशमुख, सोनार, मराठा, वंजारी व राजपूत या प्रवर्गातील शिक्षकांची नावे टाकण्यात आली. अनुसूचित जाती संवर्गातून नऊ शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी आहे. या नऊपैकी अनुसूचित जातीची केवळ दोनच नावे आहेत. उर्वरित इतर जातीचे सात शिक्षक या यादीमध्ये टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अनुसूचित जातीची पाच नावांची दुसरी यादी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व पाचही शिक्षक अनुसूचित जमाती संवर्गातील टाकण्यात आले आहेत. या यादीमध्येसुद्धा एकही अनुसूचित जाती संवर्गातील नाव नाही. ही फाइल आस्थापना लिपिक., अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी यांच्या हाताखालून तपासली जाऊन शिक्षणाधिकार्‍यांकडे जाते. त्यानंतरही यादीतील चूक लक्षात आली नाही.

Web Title: Education department's list of seniority list!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.