पारंपरिक रावण दहनाला इको फ्रेन्डली टच!
By Admin | Updated: October 1, 2014 00:37 IST2014-10-01T00:37:55+5:302014-10-01T00:37:55+5:30
खामगाव येथील ‘कले’च्या कोंदणामुळे यंदाचा रावण दहन सोहळा ठरणार खास.

पारंपरिक रावण दहनाला इको फ्रेन्डली टच!
खामगाव (बुलडाणा): अहंकारी वृत्तीचा नाश करण्यासाठी शहरात दसर्याच्या दिवशी रावण दहन करण्याची पुरातन परंपरा आहे. या परंपरेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, यंदा प्रथमच इको फ्रेन्डली रावण दहन केल्या जाणार आहे. त्यामुळे रजतनगरीतील यंदाचा रावण दहन सोहळा असंस्मरणीय ठरणार आहे.
शहरातील पुरातन बालाजी संस्थानच्यावतीने चिखली रोडवरील रावण टेकडीवर रावण दहन करण्याची गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा आहे. दसर्याचे सोने लुटण्यासाठी जाणार्या शहरवासीयांसाठी हा सोहळा एक आनंदपर्वणीच असते; मात्र संसाधनाच्या अभावामुळे आतापर्यंत एका कापडी पडद्यावर रावणाचे चित्र रेखाटून ते चित्र दहन केल्या जात होते. कापडी पडदा असल्यामुळे काही सेकंदातच रावण दहन होत असल्याने अनेकांचा हिरमोड होत होता. काहींना काही कळायच्या आतच संपूर्ण सोहळा आटोपत असे. त्यामुळे बालाजी संस्थानच्यावतीने यावर्षी शहरातील नागरिकांना नवरात्रोत्सवाची अनोखी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार यावर्षी २७ फूट रावणाच्या मनोहारी मूर्तीचे दहन केल्या जाणार आहे. शहरातील एका हौसी कलावंताने मनोहारी रावण तयार करण्याची तयारी दर्शविल्याने यावर्षीचा रावण दहन सोहळा अतिशय संस्मरणीय ठरणार आहे.