लवकर येणाऱ्या सोयाबीनने शेतकरी होताहेत मालामाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:18+5:302021-09-13T04:33:18+5:30
बुलडाणा : कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा नवनवीन वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी लवकर ...

लवकर येणाऱ्या सोयाबीनने शेतकरी होताहेत मालामाल!
बुलडाणा : कमी दिवसात उत्पन्न हाती येईल, अशा नवनवीन वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी लवकर येणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून, सध्या या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यात भावही १० हजार प्रतिक्विंटलच्या आसपास असल्याने लवकर येणाऱ्या सोयाबीनने शेतकरी मालामाल होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सोयाबीन पिकाला ऐन सोंगणीच्या हंगामात पावसाचा फटका बसत आहे. शिवाय सोयाबीनचे तेच ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणाची लागवड केलेली आहे. कमी दिवसात येणारी सोयाबीन सोंगणी सध्या सुरू असून शिवाय बाजारात भावही १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने या शेतकऱ्यांना ही सोयाबीन अडचणीत आर्थिक आधार देणारी ठरत आहे.
लवकर येणाऱ्या सोयाबीनचे असे आहेत फायदे...
लवकर येणाऱ्या सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते, त्यामुळे भाव चांगला मिळतो.
शेत लवकर रिकामे झाल्याने रब्बी हंगामाचे चांगले नियोजन होऊ शकते.
सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा चांगला राहतो. इतर पिके घेण्यासाठी फायदा होतो.
तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावे....
शेतकऱ्यांनी तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावी. त्यामध्ये लवकर, मध्यम आणि उशिरा. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते. सध्या लवकर येणाऱ्या सोयाबीनला चांगले दिवस आले आहेत.
- सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ज्ञ.
काय म्हणतात शेतकरी...
मी लवकर येणारे सोयाबीन घेतले. सध्या भावही चांगले आहेत. यंदा पहिल्यांदाच सोयाबीनने चांगले उत्पन्न दिले.
- सिद्धेश्वर देशमुख.
कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे, परंतु सोयाबीन सोंगणीच्या हंगामातच पावसाचा फटका बसू नये.
- प्रशांत कानोडजे.
लवकर येणारे वाण आणि दिवस
९५६०: ८५ दिवस
९३०५: ८७ दिवस
२०३४: ८५ दिवस
सोयाबीन पेरा
३८८३२४