ई पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:10+5:302021-04-27T04:35:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली ...

ई पास नावालाच; कोणीही यावे, टिकली मारून जावे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदीही करण्यात आली असून, ई पास असल्याशिवाय शहरांमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. बुलडाणा शहरामध्ये केवळ शहर पाेलीस स्टेशनसमाेर काही तासच वाहनांची तपासणी करण्यात येते. त्यानंतर संचारबंदीतही वाहनांची दिवसभर वर्दळ सुरू असते.
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत. शहरांमध्ये ई पास असल्याशिवाय प्रवेश नाकारण्यात आला आहे.
बुलडाणा शहरात मात्र पाेलीस स्टेशनसमाेर काही तास तपासणी करण्यात येते. त्यानंतर दिवसभर व रात्री वाहनांचा मुक्त संचार सुरू असताे. त्यामुळे ई पास नावालाच, कुणीही यावे, टिकली मारून जावे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
त्रिशरण चाैक
बुलडाणा शहरात खामगाव आणि चिखली मार्गाने प्रवेश केल्यानंतर त्रिशरण चाैक लागताे. या चाैकात पाेलीस, महसूल आणि नगर पालिकेचे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शहरात ई पास नसलेलेही मुक्तपणे संचार करीत असल्याचे चित्र आहे.
सर्क्युलर राेड
ग्रामीण भागातून चिखली मार्गाने शहरात आलेली खासगी वाहने आणि दुचाकीधारक सर्क्युलर राेडने शहरात प्रवेश करतात. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी वाहने सकाळी ११ नंतरही दिवसभर सुरू असतात. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.
मलकापूर राेड
मलकापूर रस्त्याने बुलडाणा शहरात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांवर कुठलीही कारवाई हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडे ई पास आहे किंवा नाही याची पडताळणीच हाेत नसल्याने ग्रामस्थांचा शहरामध्ये मुक्त संचार वाढला आहे. त्यामुळे काेराेना रुग्ण वाढत आहेत.
कर्मचाऱ्यांची वानवा
पाेलिसांकडे मनुष्यबळ ताेकडे असल्याने सर्वच रस्त्यांवर बंदाेबस्त ठेवणे अशक्य असल्याचे चित्र आहे.
नगर पालिका आणि महसूलचे पथक अजूनही रस्त्यावर कारवाई करण्यासाठी उतरले नसल्याचे चित्र आहे. केवळ पाेलीस काही वेळासाठी वाहनांची तपासणी करीत असल्याचे चित्र आहे.
सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू करण्यात येत असली तरी दिवसभर दुचाकी व इतर वाहनांचा मुक्त संचार असताे. बुलडाणा शहरात रुग्णसंख्या वाढत असली तरी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.