मळणीयंत्रात चिरडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: October 26, 2014 23:54 IST2014-10-26T23:54:53+5:302014-10-26T23:54:53+5:30
मळणीयंत्राद्वारे सोयाबीन काढत असताना तोल गेल्याने तरूणाचा मृत्यू, देऊळगावराजा येथील घटना.

मळणीयंत्रात चिरडून तरुणाचा मृत्यू
देऊळगावराजा (बुलडाणा) : मळणीयंत्राद्वारे सोयाबीन काढत असताना तोल गेल्याने विकास भाऊराव वाघ (२४ रा. पांगरी माळी) या तरुणाचा यंत्रात चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना चिखली रोडवर सर्मथ कृषी महाविद्यालयानजीक असलेल्या शेतात रविवारी दुपारी ४.३0 वाजता घडली. पांगरी माळी येथील दत्तात्रय लक्ष्मण वाघ यांचे शेत चिखली रोडलगत आहे. त्यांच्या शेतात सोंगणी केलेले सोयाबीन शंकर सखाराम वाघ यांच्या मळणी यंत्रातून काढण्याचे काम रविवारी सुरू होते. या मळणीयंत्रावर विकास वाघ हा तरुण यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम करत होता. रविवारी सोयाबीन काढण्याचे काम शेवटच्या टप्प्यात होते. त्यावेळी यंत्रावर जाऊन पायाने सोयाबीन ढकलत असताना तोल गेल्याने विकास वाघ पायाकडून यंत्रात ओढला गेला. यंत्र सुरू असल्याने मोठय़ा दातर्यामध्ये चिरडून काही क्षणातच त्याचा जागीच करुण अंत झाला. ही घटना निदर्शनास येताच तिथे उपस्थित शेतकर्यांनी यंत्र त्वरित बंद केले. विकास वाघ याचा गळ्यापासून ते पायापर्यंतचा भाग यंत्रात होता. फक्त डोकेच वर राहिले होते. देऊळगावराजा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी उत्तरीय तपासणीकरिता त्याचा मृतदेह दाखल केला. रात्री नऊ वाजता मृतक विकासच्या पार्थिवावर पांगरी माळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण भागात मळणीयंत्रातून सोयाबीन काढणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात घडतात. मात्र, मळणी यंत्रात चिरडून अवघ्या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.