हुंड्याच्या तगाद्यापायी विवाहितेने जाळून घेतले!
By Admin | Updated: October 7, 2015 01:56 IST2015-10-07T01:56:14+5:302015-10-07T01:56:14+5:30
हुंडा मागणीच्या त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने जाळून घेतल्याची घटना; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

हुंड्याच्या तगाद्यापायी विवाहितेने जाळून घेतले!
खामगाव : हुंडा मागणीच्या त्रासाला कंटाळून २३ वर्षीय विवाहितेने जाळून घेतल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी आवार येथे घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील आवार येथील रूक्मिणी सचिन गावंडे (वय २२) या विवाहितेने २ ऑक्टोबर रोजी स्वत:ला जाळून घेतले होते. तिला सर्वप्रथम खामगाव येथील सामान्य रूग्णालयात जळालेल्या अवस्थेत आणले होते. दरम्यान, अकोला येथे पाठविण्यात आले होते; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान, अकोला येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतक रूक्मिणीचा भाऊ अमोल शालीग्राम कड (वय २५) रा.घारोड याने ६ ऑक्टोबर रोजी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीत नमूद आहे की, रूक्मिणी व तिचा पती सचिन गावंडे यांना आकांक्षा (वय ३) वर्षांची मुलगी आहे. रूक्मिणीला तिचा जेठ नारायण गावंडे, जेठाणी राधा नारायण गावंडे, सासरा हरिभाऊ गावंडे व सासू कमला गावंडे हे घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून तगादा लावून छळ करीत आहे. सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तिने २ ऑक्टोबर रोजी जाळून घेतले व मृत पावली, असे नमूद आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरुद्ध कलम ४९८ (अ), ३0४ (ब), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहा. पोलीस निरीक्षक संजय निकुंभ करीत आहेत.