धुळ पेरणीही धुळीत
By Admin | Updated: July 5, 2014 23:48 IST2014-07-05T22:31:31+5:302014-07-05T23:48:48+5:30
पावसाच्या दडीमुळे ही धुळ पेरणी धुळीस मिळाली असून, अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

धुळ पेरणीही धुळीत
सिंदखेडराजा : तालुक्यात मोठय़ा प्रमाणात धुळ पेरणी करण्यात आली होती. परंतू, पावसाच्या दडीमुळे ही धुळ पेरणी धुळीस मिळाली असून, अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
शहरासह परिसरात रोहिणी नक्षत्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे शेतकर्यांनी मृग नक्षत्रातच खरीप हंगामाची पेरणी आटोपली. त्याचबरोबर कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकाची मोठय़ा प्रमाणात धुळ पेरणी तालुक्यातील शेतकर्यांनी केली. परंतू, निसर्गाची अवकृपा झाल्यामुळे केलेली धुळ पेरणी वाया गेली असून, खत व बीयाण्यासाठी लागलेल्या लाखो रुपयाने शेतकर्यांचे नुकसान झाले. आर्थिक संकटात असलेला बळीराजा दुबार पेरणीने अधिकच हवालदिल झाला आहे. सिंदखेडराजा, माळ सावरगांव, नशिराबाद, शिवणी टाका, सावखेड तेजन, जांभोरा, अंचलीसह अध्र्या तालुक्यातील शेतकर्यांनी कपाशी, सोयाबीन व मका पिकाची धुळ पेरणी केलेली आहे. गतवर्षी ३ जुलै पर्यंत २१३ मी.मी. पाऊस झाल्याची नोंद होती. मात्र, यावर्षी २ जुलै पर्यंत फक्त ४३ मी.मी. पाऊस झाला आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे परिसरातील खरीप पिक हे सुकण्याच्या वाटेवर आहे. कपाशीची रोपे वाचविण्यासाठी हंड्याने पाणी टाकण्यात शेतकरी गुंतला आहे. धुळ पेरणी वायाला गेलेल्या भागाचा सर्वे करुन शेतकर्यांना दुबार पेरणीच्या बियाण्यासाठी मदत करावी, अशी मागणी बबनराव आढाव, भगवान मेहेत्रे, बळवंता मेहेत्रे, गोरखनाथ राठोड आदींनी केली आहे.