नाकाबंदी दरम्यान दुचाकीवर पावणे पाच लाखांची रोकड पकडली
By अनिल गवई | Updated: November 8, 2024 20:56 IST2024-11-08T20:56:34+5:302024-11-08T20:56:56+5:30
जलंब पोलिस स्टेशन हद्दीतील जलंब बसस्थानकावरील घटना

नाकाबंदी दरम्यान दुचाकीवर पावणे पाच लाखांची रोकड पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नाकाबंदी दरम्यान जलंब पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी एका दुचाकीस्वाराकडून चार लाख ६७ हजार ३५० रुपयांची रोकड जप्त केली. या रकमेच्या वाहतुकीसंबंधी कोणताही परवाना नसल्यामुळे जलंब पोलिसांनी ही रक्कम निवडणूक निर्णय अधिकारी, खामगाव यांच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे जलंब परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, निवडणुकीच्या अनुषंगाने जलंब पोलिसांनी शुक्रवारी नाकाबंदी केली. तपासणी दरम्यान एक दुचाकीस्वार जलंब बस स्थानकावर चार लाख ६७ हजार ३५० रुपयांची रोकड घेऊन जाताना आढळून आला. जलंब पोलिसांनी रक्कम आणि दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने संबंधित रक्कम ही पेट्रोल पंपावरील असून, संबंधित रक्कम बँकेत जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. संबंधितांकडे या रकमेबाबत तसेच रकमेच्या वाहतुकीबाबत कोणताही परवाना नसल्याने रकमेच्या जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम व रकमेबाबत आवश्यक ती कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी खामगाव यांच्याकडे वर्ग करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई जलंब पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे, पीएसआय श्याम पवार, पोहेकॉ गोविंदा होनमाने, महिला सहायक फौजदार चंद्रलेखा शिंदे-सावळे, पोकॉ संदीप गावंडे, अमोल कव्हळे यांच्यासह जलंब पोलिस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.
....