नियोजनाअभावी पाणीटंचाईचे चटके : प्रशासन ढिम्म!

By Admin | Updated: May 26, 2017 01:25 IST2017-05-26T01:25:32+5:302017-05-26T01:25:32+5:30

पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी बळी जात आहे; मात्र संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही.

Due to lack of planning, water scarcity: Administration dhim! | नियोजनाअभावी पाणीटंचाईचे चटके : प्रशासन ढिम्म!

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे चटके : प्रशासन ढिम्म!

उद्धव फंगाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मेहकर तालुक्यात अनेक गावांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा कृती आराखडा दरवर्षी तयार करण्यात येतो; परंतु तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रत्यक्षात कामे होताना दिसत नाही. नियोजनाअभावी मेहकर तालुक्यात पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत असून, पाणीटंचाईमुळे मेहकर तालुक्यात दरवर्षी बळी जात आहे; मात्र संबंधित विभागाकडून पाणीटंचाईचा प्रयत्न गंभीरतेने घेतल्या जात नाही.
मेहकर तालुक्यात जवळपास १४० गावे येतात. त्यापैकी जवळपास ८० ते ८५ गावात पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. या कृती आराखड्याला मंजुरात मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी सुरु होते; परंतु प्रत्यक्षात पाणी टंचाईचे नियोजन बरोबर नसल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे भयानक चित्र निर्माण होत आहे, तर मागील वर्षी पाणीटंचाईमुळे एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले. तर यावर्षीसुद्धा एका महिलेला पाण्यामुळेच आपला जीव गमवावा लागला. अशा बिकट परिस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी ज्या गावात घटना घडली त्या गावात जाऊन केवळ औपचारिकता पूर्ण करून कागदोपत्री पाणीटंचाई निवारण्याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवितात, तर वरिष्ठ अधिकारीसुद्धा कागदावरचा अहवाल पाहून घडत असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. अधिकाऱ्यांच्या या कागदी घोड्यांमध्ये मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब जनता भरडल्या जात आहे. पाणीटंचाईवर मेहकर तालुक्यात दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. पाणीटंचाईसाठी शासन लाखो रुपये देत असताना पाणीटंचाई निर्माण होते कशी, लाखो रुपये जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणामुळे मात्र गरिबांचे दरवर्षी हाल होत आहेत.

५९ गावात तीव्र पाणीटंचाई
मेहकर तालुक्यात ५९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, ४९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, तर ८ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी टंचाईचे भयानक चित्र तालुक्यात पहायला मिळत असून, नियोजनाअभावी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

पाणी टंचाईचे दोन वर्षात दोन बळी
मेहकर तालुक्यात दरवर्षी तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई निर्माण होत आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन उपाययोजना करण्यात येतात; मात्र स्थानिक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाणीटंचाईचे भयानक चित्र तयार होत आहे, तर याच पाणीटंचाईमुळे २०१६ मध्ये दादुलगव्हाण येथील महेश देवानंद शेजुळ या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा पाणी भरताना विहिरीत पडून मृत्यू झाला होता, तर यावर्षी २०१७ मध्ये पार्डी येथील सावित्री सहदेव होगे या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे सतत दोन वर्षात पाणीटंचाईमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कायम पाणीटंचाई निवारण योजना गायब
गेल्या काही वर्षांपासून मेहकर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या वाढतच आहे. त्यामुळे काही गावातील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये महाजल, जलस्वराज राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांवर शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केला आहे; परंतु ज्या-ज्या गावात ही योजना राबविण्यात आली, त्या गावाची पाणी समस्या आज रोजी कायमच आहे. निकृष्ट व अर्धवट कामामुळे या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे या योजनांची कामे करणारे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करुन कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Due to lack of planning, water scarcity: Administration dhim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.