सलग सुट्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त
By Admin | Updated: October 25, 2014 23:28 IST2014-10-25T23:28:34+5:302014-10-25T23:28:34+5:30
आर्थिक व्यवहारावर झाले विपरीत परिणाम.

सलग सुट्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त
खामगाव (बुलडाणा) : ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा नोकरशहांसाठी पर्वणी ठरला. सलग पाच दिवस आलेल्या सुट्यांमुळे अनेकांनी पिकनिकची मौज घेता येणार आहे. काही नोकरशहांनी आपली वैयक्तिक कामे मार्गी लावण्यासाठी या सुटीचा उपयोग घेतला आहे.
ऑक्टोबर महिना म्हटला, की सणासुदीची रेलचेल. दसरा, दिवाळी, बकरी ईद, नवरात्रोत्सव आदी महत्त्वाचे उत्सव याच महिन्यात येतात. त्यामुळे नोकरशहांसाठी सुट्यांची मौज उ पभोगण्याची पर्वणी याच महिन्यात असते. यंदाचे वर्षही याला अपवाद नाही. उलट दरवर्षी पेक्षा यंदा सणांच्या सुट्या सलग आल्या आहेत. २३ तारखेची दिवाळी होती. त्यामुळे शासकीय कार्यालयांना सुटी होती. २४ तारखेलाही बलिप्रतिपदेची सुटी असल्यामुळे कार्यालये बंद होती. २५ तारखेला चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुटी राहिली. योगायोग म्हणजे याच दिवशी भाऊबीज आल्याने नोकरशहांचा आनंद द्विगुणित झाला. उद्या २६ ऑक्टोबरला रविवार आहे.
नोकरशहांना सलग पाच दिवस सुटी मिळाली आहे. नेमक्या याच दिवसांत शाळांनाही सुट्या असल्यामुळे बर्याच नोकरशहांनी आपल्या कुटुंबासोबत सहलीचा बेत पूर्ण केला.
सलगच्या सुट्यांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार पार ठप्प झाले आहेत. बँकाना चार दिवसांची आलेली सुटी, शिवाय दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झालेली उलाढाल यामुळे बहुतांश बँकाच्या एटीएममधील पैसे संपले आहेत. एटीएममधील ठणठणाटांचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागला, हे विशेष.
शासकीय कामांचा होणार खेळखडांबा
दिवाळीच्या सलग पाच दिवसांच्या सुट्यांमुळे शासकीय कामकाजाचा पार खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येलादेखील अनेक कार्यालयातील कर्मचार्यांनी सुटी टाकली होती.
अशाप्रकारे सहा दिवस शासकीय कामकाज बंद राहणार असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसणार असल्याचे दिसून येत आहे.
गत महिनाभरापासून निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प झाले होते. सर्व अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले होते. आता सलग सुट्यांमध्ये पुन्हा कामकाज बंद पडले.