अत्यल्प विद्यार्थ्यांमुळे पोषण आहार वाटप उद्देशाला हरताळ
By Admin | Updated: May 5, 2015 00:11 IST2015-05-05T00:11:40+5:302015-05-05T00:11:40+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील १४१४ शाळांचा समावेश; शिक्षकांमध्ये मात्र उमटतोय नाराजीचा सूर.

अत्यल्प विद्यार्थ्यांमुळे पोषण आहार वाटप उद्देशाला हरताळ
बुलडाणा : ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात उन्हाळ्याच्या सुट्टीतही शालेय पोषण आहार दिला जावा, असा निर्णय राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४१४ शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही शालेय पोषण आहार दिला जात आहे; परंतु शाळेला सुट्टय़ा लागल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या अल्प आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थी येतच नाहीत. त्यामुळे शासनाच्या पोषण आहार वाटपाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असून, शिक्षकांनी शासनाच्या या निणर्याप्रती नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांना नापिकी सहन करावी लागली. नंतरही अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे रबी पिकांचेही नुकसान झाले. ही बाब लक्षात घेऊन शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्वेक्षण करून ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले. त्यात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने काही पॅकेज जाहीर केले. त्याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण संचालकांनी अशा भागातील शाळांनी उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अर्थात तांदूळ शिजवून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील १४१४ शाळांमध्ये उन्हाळी सुट्टीत शालेय पोषण आहार देण्याचे पत्न बुलडाणा येथील प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी सर्व शाळांना दिले आहेत. त्यामुळे या आदेशानुसार सर्व शाळांमध्ये सकाळी तेथे शिकणार्या मुलांना शाळेत बोलावून खिचडी खाऊ घालणे बंधनकारक झाले आहे.