आमखेड तलाव फुटल्याने ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:48+5:302021-06-30T04:22:48+5:30

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात ...

Due to the eruption of Amkhed lake, 5,000 hectares of land was destroyed | आमखेड तलाव फुटल्याने ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली

आमखेड तलाव फुटल्याने ५ हजार हेक्टरवरील शेती खरडली

या पावसामुळे प्रभावीत झालेल्या गावांतील शेतजमिनीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाने नंतर उघडीप दिली होती. मात्र २८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे अतिवृष्टीसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गांगलगाव, आमखेड, अंबाशी, एकलारा, पाटोदा गावांतील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती खरडून गेली. अंबाशी, आमखेड, येवता, खैरव, एकलारा, पाटोदा गावांत पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे आमखेड पाझर तलावाची भिंत फुटल्याने जनजीवनही विस्कळीत झाले होते. दुसरीकडे कोराडी नदीला पूर आल्यामुळे अंबाशी गावातील बहुतांश नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांच्या उभारणीकरिता शासनाने दुबार पेरणीकरिता खत, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

चिखली तालुक्यातील कोलारा, बेराळा, भालगाव, येवता, गांगलगाव, खैरव, आमखेड, एकलारा, तेल्हारा, काटोदा या गावांत अक्षरशः ढगफुटीसदृश चित्र होते. संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. आमखेड येथील तलाव फुटल्याने पेरणी झालेली शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. गांगलगाव येथील नदी पातळी ओलांडून वाहत होती. नदी फुटल्यानेही अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली. शेतात कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे दुबार पेरणीचे संकट या भागातील शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

२८५६ शेतकऱ्यांचे नुकसान

या पावसामुळे आमखेड येथील ८५ शेतकऱ्यांचे २६ हेक्टरवरील नुकसान झाले. अंबाशीमधील ३५० शेतकऱ्यांचे २६० हेक्टर, रानअंत्रीत ११० जणांचे ८० हेक्टर, पिंपळवाडीतील ६ जणांचे ४ हेक्टर, दे.धनगर येथील ६ शेतकऱ्यांचे ८ हेक्टर, रोहडा येथील ९१० शेतकऱ्यांचे ७०० हेक्टर, गांगलगाव येथील ४२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, शे. आटोळ येथील ६ शेतकऱ्यांचे ३.५० हेक्टर, पाटोदामधील २२० जणांचे ९८, एकलारामधील ६५५ जणांचे ४५० हेक्टर, तेल्हारा येथील ७० जणांचे २८ हेक्टर, चंदनपूर येथील एका शेतकऱ्याचे ०.५० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. या ११ गावांतील २८५६ शेतकऱ्यांची २००८ हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याची प्राथमिक माहिती तालुका प्रशासनाने दिली. आमखेड, अंबाशी, रानअंत्री, रोहडा येथील ७५ विहिरींचे मोठे नुकसान झालेले आहे. या पावसामुळे या भागातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि कापसाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

तातडीने पंचनामे करा - महाले

या पावसामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, एकही शेतकरी यातून सुटता कामा नये, असे आदेश आ. श्वेता महाले यांनी तहसीलदार अजितकुमार येळे यांना दिले आहेत.

तातडीने पंचनामे करा

चिखली तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे तसेच आमखेडचा तलाव फुटल्याने जमीन खरडली आहे. नेमके किती नुकसान झाले हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश तहसीलदार अजितकुमार येळे यांनी दिले आहेत.

तात्काळ आर्थिक मदत द्या

२८ जून रोजी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक प्रकोपातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने दुबार पेरणीकरिता खते, बियाणांसह मशागतीकरिता तात्काळ आर्थिक मदत करावी. शासनाने शेतकऱ्यांना या अडचणीत वेळेत शक्य तेवढी मदत करून दिलासा देणे आवश्यक असल्याचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Due to the eruption of Amkhed lake, 5,000 hectares of land was destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.