पोळा सणावर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 24, 2014 01:00 IST2014-08-24T01:00:15+5:302014-08-24T01:00:15+5:30
बाजारपेठ सजली; व्यापारी शेतकर्यांच्या प्रतीक्षेत

पोळा सणावर दुष्काळाचे सावट
लोणार : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्यांना दुबार ते तिबार पेरणी करावी लागली. त्यामध्येही आता खरीप हंगामाची पिके धोक्यातच असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बैलांना सजविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याने दरवर्षीप्रमाणे बाजारपेठ फुलली असली तरी व्यापार्यांना शेतकर्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असल्यामुळे पोळा सणावर विरजण पडले आहे.
कृषिप्रधान देशात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण असून, ज्यांच्याकडे शेती नाही, ते मातीच्या बैलांची पूजा करून पोळा सण साजरा करतात. वर्षभर शेतात राबराब राबणार्या सर्जा - राज्याच्या या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी होऊन शेतात पिके डोलताना दिसतात. शेतशिवारात सगळीकडे हिरवळ असते. एकूण शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असते; परंतु यावेळेस खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अल्प प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकर्यांनी पेरण्या केल्या; परंतु बहुतांश शेतकर्यांच्या सुरुवातीच्या पेरण्या वायाच गेल्या. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अनेक शेतकर्यांना दुबार ते तिबार पेरणी करावी लागली. यामध्ये महागडे बी-बियाणे, रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकर्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. सद्यपरिस्थितीतसुद्धा खरीप हंगामाची पिके धोक्यातच असल्याने उंबरठय़ावर येऊन ठेपलेल्या पोळा सणाला शेतकर्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही. २५ ऑगस्ट रोजी पोळा सण असून, बैल सजविण्यासाठी लागणार्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे; परंतु आठवडी बाजाराच्या दिवशीसुद्धा पोळ्यानिमित्त बैल सजावटीचे साहित्य विक्री करणार्या दुकानांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता.
बुलडाणा परिसरातील आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. अनेक व्यापार्यांनी पोळ्यानिमित्त आठवडी बाजारातील मुख्य रस्त्यावर दुकाने थाटली आहेत; मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षी शेतकरी वर्ग साहित्य घेताना दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे.