डेंग्यूसदृश तापामुळे चिमुकली अत्यवस्थ
By Admin | Updated: October 29, 2014 00:23 IST2014-10-29T00:23:09+5:302014-10-29T00:23:09+5:30
लोणार तालुक्यातील कारेगाव येथे अज्ञात तापाची साथ.

डेंग्यूसदृश तापामुळे चिमुकली अत्यवस्थ
कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील कारेगाव येथे अज्ञात तापाची साथ पसरली असून, एका सहा वर्षीय चिमुकलीला डेंग्यूसदृश ताप असल्याचे आढळून आले आहे.
लोणार तालुक्यातील बिबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या कारेगाव येथे सध्या मलेरिया, सर्दी, खोकला, ताप यासारख्या विविध आजाराने थैमान घातले आहे. अशातच कारेगाव येथील प्रांजली गजानन टोलमारे या सहा वर्षीय चिमुकलीला डेंग्यूसदृश ताप असल्याचे आढळून आले असून, तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण वाढतच असून, घराघरात अज्ञात तापाचे रुग्णही दिसून येत आहेत. तरीसुद्धा आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकूनही पाहत नाहीत. यामुळे गावकरी विविध आजारांनी ग्रासले असून, याकडे आरोग्य विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. शासनाच्या आरोग्य सुविधा मिळत नसून, त्यांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात नाहीत. त्यामुळे स्वच्छता अभियान राबवावे व रुग्णांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भागवत चव्हाण, गजानन टोलमारे यांनी केली आहे.