सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगाला फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:08+5:302021-08-24T04:39:08+5:30
साखरखेर्डा, शिंदी, सवडद, राताळी, गुंज, वरोडी, पिंपळगाव सोनारा, शेंदुर्जन, गोरेगाव, उमनगाव या भागात मुगाचे पीक अनेक शेतकरी घेतात. कपाशीत ...

सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगाला फुटले कोंब
साखरखेर्डा, शिंदी, सवडद, राताळी, गुंज, वरोडी, पिंपळगाव सोनारा, शेंदुर्जन, गोरेगाव, उमनगाव या भागात मुगाचे पीक अनेक शेतकरी घेतात. कपाशीत अंतर पीक म्हणूनही मुगाचे पीक घेतले जाते. मुगाचे पीक हे ७५ दिवसांचे असल्याने मूग तोडणीला आला असून, नेमके तोडणीलाच पावसाने हजेरी लावली आहे. दररोज कधी ना कधी पाऊस पडत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. तीन दिवस सूर्यदर्शनसुद्धा झाले नाही. याचा फटका मुगाच्या पिकांना बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वाळलेल्या मुगाच्या शेंगाला कोंब फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास निसर्गाने हिरवण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकरी अडचणीत
अगोदरच शेतकऱ्यांनी दुबार, तर काहींनी तिबार पेरणी केलेली आहे. महागडे बी बियाणे आणून पेरणी केली आहे. आता सततच्या पावसामुळे शेंगांना कोंब फुटले असल्याने हे नुकसान शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहे. शिंदी येथील शेतकरी श्रीधर तेजराव खरात यांच्या शिंदी शिवारातील गट नंबर २२६ मधील एक हेक्टर मुगाच्या पिकाचे सततच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. मुगाला कोंब येऊन मुगाचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. मुगाला बाजारात चांगला भाव असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये मूग पेरला होता; परंतु निसर्गापुढे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.