दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा

By Admin | Updated: February 25, 2016 01:47 IST2016-02-25T01:47:23+5:302016-02-25T01:47:23+5:30

दुष्काळ निवारण मंडळ; चुकीच्या धोरणांमुळे शेती धोक्यात आल्याचा आरोप.

Drought crisis Sultani - Desarda | दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा

दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा

बुलडाणा : राज्यात सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत असून, संकटाचे मूळ हे अस्मानी कमी अन् सुलतानी जास्त आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी चुकीची शेतधोरणे राबविल्याने शेती धोक्यात आली असून, आता जलयुक्त शिवाराच्या नावाखाली पुन्हा एकदा धूळफेक चालविली असल्याचा आरोप दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रख्यात अर्थतज्ज्ञ एच.एम.देसरडा यांनी केला. दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संवाद यात्रेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रा.देसरडा म्हणाले की, महात्मा फुले जल-भूमी अभीयानाचे नाव बदलून जलयुक्त शिवार ठेवण्यात आले आहे. हे अभियान म्हणजे शुद्ध धूळफेक असून, नदी खोलीकरणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने जलसंधारणाची कामे केली जात आहेत. मुळातच राज्यकर्त्यांनी शेतीच्या धोरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शेती अडचणीत आली असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येणार्‍या काळात दुष्काळ निवारण्यासाठी कोट्यवधीचा निधी खर्च होईल. या निधीमधून मिळणारे कमिशन खाणारी जमात मात्र गब्बर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या संवाद यात्रेतून दुष्काळाची कारणे, उपाययोजना, प्रबोधन अशा स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यात काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, प्राचार्य डॉ.अंभोरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या आधी प्रा.देसरडा यांनी जिजामाता महाविद्यालयात शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ही संवाद यात्रा बुलडाण्यावरून चिखलीकडे रवाना झाली.

Web Title: Drought crisis Sultani - Desarda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.