चालकाला डुलकी, खासगी प्रवाशी बस दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू; आठ प्रवाशी जखमी
By निलेश जोशी | Updated: May 23, 2023 13:45 IST2023-05-23T13:45:23+5:302023-05-23T13:45:39+5:30
समृद्धी महामार्गावर दुसरबीड नजीकची घटना: पहाटे २.:१५ वाजता घडला अपघात.

चालकाला डुलकी, खासगी प्रवाशी बस दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू; आठ प्रवाशी जखमी
सिंदखेड राजा: समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. २३ मे रोजी पहाटे २:१५ वाजता खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन ती दुभाजकाला धडकली. यात बसच्या क्लिनरचा मृत्यू झाला असून ८ प्रवाशी जखमी झाले आहे. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.
या अपघातामध्ये बसचा क्लीनर उल्लाह दुबे हा ठार झाल्याची माहिती आहे. बस चालक सध्या बेशुद्ध असल्याने मृतक नेमका कोठला रहिवाशी आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. एमएच ४०-सीडी-८३७६ क्रमांकाची खासगी प्रवाशी बस ही नागपूरहून शिर्डीकडे जात होते. दरम्यान सिंदखेड राजा तालुक्यात दुसरबीड लगत बसच्या चालक मंगेश कुळवंते यास डुलकी लागली आणि भरधाव वेगातील ही खासगी प्रवासीबस डिव्हायडरवर धडकली. त्यात बसमधील ८ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. क्लिनरचा मात्र या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच एपीआय बकाल व त्याचे सहकारी ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना क्यूआरव्ही व एमएसएफच्या मदतीने सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. या बसमध्ये एकूण ३६ प्रवाशी होती. किरकोळ जखमी वगळता अन्य प्रवाशांना दुसऱ्या खासगी प्रवाशी बसद्वारे पुढील प्रवासासाठी रवाना केले आहे.