अस्वच्छ परिसरातच विद्यार्थी पितात पाणी!
By Admin | Updated: November 19, 2014 01:15 IST2014-11-19T01:15:14+5:302014-11-19T01:15:14+5:30
लोकमत स्टिंग ऑपरेशन; बुलडाणा जिल्ह्यातील वास्तव; स्वच्छता अभियान शाळांपर्यंत पोहोचलेच नाही.

अस्वच्छ परिसरातच विद्यार्थी पितात पाणी!
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये सध्या साथ रोग वेगाने पसरत असताना जिल्हा परिषद आणि नगर परिषद या संस्थांमार्फत कार्यान्वित असलेल्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जवळपास सर्वच जि.प. आणि न.प. शाळांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही; जेथे आहे, त्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचा परिसर हा दूषित व अस्वच्छ आहे. याच ठिकाणी विद्यार्थ्यांना पाणी प्यावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आज लोकमत ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान शहर ते गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. विविध शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला; मात्र हे अभियान अद्यापही शहरातील जि.प. आणि न.प. शाळांपर्यंत पोहोचले नाही, हे वास्तव या निमित्ताने उघडकीस आले आहे.