साखरखेर्डा : देशाचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाज घटकांसाठी तयार केले आहे. परंतु काही लोक संविधानाच्या उलट काम करीत आहेत. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आर्थिक सत्ता मूठभर लोकांच्या हाती देऊ नका, असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले. साखरखेर्डा येथील अनिकेत सैनिक स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. सामाजिक कार्य करीत असताना कोणत्याही महिलेवर अत्याचार होणार नाही, याची खबरदारी घेतली. ज्या देशात महिलांवर अत्याचार होतात, तो देश राक्षसी प्रवृत्तीचा आणि ज्या देशात महिलांचा सन्मान होतो, तो देश सुसंस्कृत व विकसनशील देश म्हणून गौरविण्यात येतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला कर्नल चंद्रशेखर रानडे, मेजर नारायण अंकुशे, कर्नल डी. एफ. निंबाळकर, ठाणेदार जितेंद्र आडोळे उपस्थित होते. माजी सैनिक तथा अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जुन गवई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सैनिक प्रकाश घोडके, महादेव गवळी, जगन्नाथ भालेराव, संतोष गायकी उपस्थित होते.
आर्थिक सत्ता मूठभर लोकांच्या हाती देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST