डॉक्टर संपावर; रुग्ण वा-यावर
By Admin | Updated: March 24, 2017 01:43 IST2017-03-24T01:43:46+5:302017-03-24T01:43:46+5:30
आयएमएकडून कारवाईची मागणी; बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार डॉक्टर संपात सहभागी

डॉक्टर संपावर; रुग्ण वा-यावर
बुलडाणा, दि.२३- मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. यावर निर्बंध घालण्याकरिता शासनाकडे वारंवार निवेदन देण्यात आले; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांनीही बुधवारी सायंकाळपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या संपात बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार डॉक्टर सहभागी झाल्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे.
आपल्या विविध मागण्यांबाबत आयएमएच्या बुलडाणा शाखेच्या पदाधिकार्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व अपर जिल्हाधिकार्यांकडे निवेदन दिले. निवेदनानुसार, डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील कायद्याचे पालन झाले पाहिजे, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे; मात्र सरकार त्याबाबत गंभीर नाही. रुग्णाच्या नातेवाइकांकडून बर्याच वेळा क्षुल्लक कारणातून डॉक्टरांना मारहाण करण्यात येते, त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी, जोपर्यंत उपाययोजना होत नाही, तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर ओपीडी बंद ठेवणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
दोन हजार डॉक्टर सहभागी
इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयातील दोन हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. यात निमा, हॉमिओपॅथी, युनानी, डेंटल असोसिएशनच्या डॉक्टरांचा सहभाग आहे.
सर्व हॉस्पिटलमधील ओपीडी व रुडींग ऑपरेशन वगळता, अतिआवश्यक वैद्यकीय सेवा रुग्णांना मिळणार आहे. संघटना डॉक्टरांना होणार्या मारहाणीच्या विरोधात आहोत. मारहाणीचा आम्हीही निषेध करीत आहोत. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय द्यावा.
- डॉ.जी.बी.राठोड, जिल्हाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, बुलडाणा