दोनशे रुपये दिल्याशिवाय मिळत नाही मातेला बाळ
By Admin | Updated: December 5, 2014 00:28 IST2014-12-05T00:28:04+5:302014-12-05T00:28:04+5:30
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; सफाई कामगारांची दादागिरी.

दोनशे रुपये दिल्याशिवाय मिळत नाही मातेला बाळ
बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला डॉक्टरांनी रुग्णालयातून सुटी दिली तरी, त्या वॉर्डातील महिला सफाई कामगार बाळ तुमच्या ताब्यात देतीलच असे नाही. त्यासाठी तुम्हाला सफाई कामगारांना २00 रुपये द्यावेच लागतात, असा धक्कादायक प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाळंतपणासाठी दररोज महिला रुग्ण भरती होतात. बाळ बाळंतिणीची प्रकृती सुधारली म्हणजे डॉक्टर रुग्णांना सुटी देतात; मात्र सुटी झालेल्या रुग्णांच्या ताब्यात लगेच बाळ दिल्या जात नाही. या वॉर्डात सफाई काम करणार्या महिला कर्मचारी सुटी झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून २00 रुपयांची सक्तीची वसुली करतात. तुमच्या बाळाची आम्ही काळजी घेतली त्याचे हे पैसे आहेत. ते द्यावेच लागतात. तोपर्यंत बाळ मिळणार नाही, अशी धमकीच या महिला सफाई कामगार रुग्णांच्या नातेवाइकांना देतात.
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हिवाळे यांना विचारणा केली असता असा प्रकार माझ्या माहितीमध्ये नाही; मात्र असे घडत असेल, तर गंभीर बाब असल्याचे नमूद केले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यात येणार असल्याचे लोकमत शी बोलताना स्पष्ट केले.
*५0 रुपयांसाठी मागावी लागली मदत
गुरुवार ४ डिसेंबर रोजी एका रुग्णाच्या नातेवाइकाजवळ पैसे नसल्यामुळे त्याला अक्षरश: गावात फिरून उसने पैसे आणावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला. रायपूर येथील एका बाळंत महिलेला रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर वॉर्डातील सफाई कामगार महिलेने सदर रुग्णाच्या नातेवाइकांना दोनशे रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडे पैसे नव्हते; मात्र तरीही पैसे आणा तेव्हा बाळ मिळेल, अशी धमकीच या महिलेने दिली. शेवटी नातेवाइकाला उसने पैसे आणून रुग्णालयातील या महिला कर्मचार्याला द्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.