‘त्या’ दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:29 IST2017-09-09T00:28:59+5:302017-09-09T00:29:10+5:30
बसस्थानक परिसरात असलेल्या चनखोरे कॉलनी, वडारपुरा, शर्मा ले-आऊट या भरवस्तीत देशी दारूचे दुकान होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दुकान बंद झाले होते; मात्र हे दुकान पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या दारूच्या दुकानाला परवाना देऊ नये, यासाठी येथील चनखोरे कॉलनी, वडारपुरा व शर्मा ले-आऊटमधील रहिवाशांनी सामूहिकपणे ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

‘त्या’ दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : बसस्थानक परिसरात असलेल्या चनखोरे कॉलनी, वडारपुरा, शर्मा ले-आऊट या भरवस्तीत देशी दारूचे दुकान होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दुकान बंद झाले होते; मात्र हे दुकान पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या दारूच्या दुकानाला परवाना देऊ नये, यासाठी येथील चनखोरे कॉलनी, वडारपुरा व शर्मा ले-आऊटमधील रहिवाशांनी सामूहिकपणे ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.
बसस्थानकासमोर सोनाटी रोडवर चनखोरे कॉलनी, वडारपुरा व शर्मा ले- आऊट या भरवस्तीला लागून जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. सदर दुकानाच्या जवळच मल्टी हॉस्पिटल आहे. त्यामुळे येथे रुग्णांची नेहमी ये-जा असते. या दारूच्या दुकानावर लोक दारू पिऊन धिंगाणा घालतात. सदर दुकान रहदारीच्या रस्त्याला लागून आहे. बसस्थानक जवळच असल्याने दारुडे दारू पिऊन बसस्थानकावर असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्रास देत असतात. दुकानापासून ३0 फूट अंतरावर मारोती मंदिर आहे. भाविकांना या दारू दुकानामुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदर दारू दुकानाचा परवाना रद्द करून येथून सदर दुकान हटवावे, अशी मागणी चनखोरे कॉलनी, शर्मा ले-आऊट, वडारपुरामधील रहिवासी गणेश लष्कर, कैलास चनखोरे, ज्ञानेश्वर आव्हाळे, शिवाजी तुपकर, रामेश्वर पिटकर, शंकर लष्कर, अर्जुन मंजुळकर, रमेश अण्णा गायकवाड, कैलास भांडेकर, सुनील जाधव, शंकर म्हस्के, अशोक मंजुळकर, विजय गायकवाड, कैलास मोरे यांच्यासह ३00 नागरिकांनी सह्यानिशी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.