मोठ्या देवीचे भगवान शंकराशी लग्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 01:19 IST2017-04-13T01:19:46+5:302017-04-13T01:19:46+5:30
खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव संपूर्ण राज्यातून एकमेव खामगाव शहरात साजरा होतो.

मोठ्या देवीचे भगवान शंकराशी लग्न!
महादेवाच्या वरातीत नाचले वाघ्या- मुरळी
अनिल गवई - खामगाव
खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी देवी) महोत्सव संपूर्ण राज्यातून एकमेव खामगाव शहरात साजरा होतो. माता पार्वतीचे रूप असलेल्या मोठ्या देवीचे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर भगवान शंकराशी लग्न लागले. लग्नापूर्वी मोठी देवी परिसरातून निघालेल्या महादेवाच्या वरातीत वाघ्या मुरळींनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
आंध्रप्रदेशातील बोधननंतर महाराष्ट्र राज्यातील खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमेपासून ११ दिवस शांती महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी पौर्णिमेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या दिवसापासूनच पुढील अकरा दिवस हा उत्सव चालतो. विजयादशमीला असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत करण्याकरिता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उत्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. दरम्यान, बोधन येथे वर्षभर पार पडणारे सर्वच उत्सव खामगावातही साजरे केले जातात. या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीच्या दिवशी मोठी देवीचे भगवान शंकराशी लग्न लावण्याची परंपराही खामगाव येथे पार पाडली जात आहे.
जगदंबा उत्सव, मोठी देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उत्सवाला वेगळे महत्त्व असून, मोठी देवीच्या लग्नाचीही एक वेगळीच परंपरा हा उत्सव राखून आहे.