बुरशीयुक्त काळ्या गव्हाचे वितरण
By Admin | Updated: August 31, 2015 01:26 IST2015-08-31T01:26:00+5:302015-08-31T01:26:00+5:30
नांदुरा येथील रेशन दुकानांतून गोरगरिबांच्या जिवाशी खेळ.

बुरशीयुक्त काळ्या गव्हाचे वितरण
नांदुरा (जि. बुलडाणा) : सणासुदीच्या काळात तालुक्यातील रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांंना ओल्या बुरशीयुक्त काळ्या रंगाच्या गव्हाचे वितरण होत असून, सदर काळा गहू हा दुर्गंंधीयुक्त व आरोग्यास धोकादायक असल्याची ओरड लाभार्थी करत असतानाही रेशनप्रणालीतून तालुका पुरवठा विभाग सदर गव्हाचे वितरण करीत असल्याने लाभार्थी संतप्त झाले आहेत. वरिष्ठांनी याबाबत या काळ्या बुरशीयुक्त ओल्या गव्हाचे नमुने तपासून याचे वितरण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रेशन प्रणालीमार्फत जुलै व ऑगस्टच्या धान्य साठय़ाचे वितरण रेशन दुकानातून होत आहे. यामध्ये वितरित केल्या जाणारा गहू हा ओला, बुरशीयुक्त व काळ्या रंगाचा असल्याने सदर निकृष्ट गहू आरोग्यास घातक असतानाही त्याचे वितरण बिनधास्तपणे सुरू आहे. याबाबत काही रेशन लाभार्थ्यांंनी रेशन परवानाधारक दुकानदारास विचारणा केली असता आलेला गहू अशाच पद्धतीचा आहे. तुम्हाला हवा असल्या न्या, असे सांगून सदर दुकानदार हा आरोग्यास घातक गहू वितरित करीत आहे. आरोग्यास घातक धान्य पुरवठा अधिकार्यांनी वितरित करायला नको होते; मात्र त्यांनी तालुक्यातील बहुतांश रेशन दुकानदारांना सदर गव्हाचे वितरण केले आहे. काही दुकानदारांनी याबाबत ओरड केली असता त्यांना योग्य समज दिल्याने त्यांनीही आता या गव्हाचे वितरण सुरू केले आहे. याबाबत शासकीय धान्य गोदामास भेट दिली असता सर्वत्र गोदामात धान्य विखुरलेले पाहण्यास मिळाले. एका भागात चांगला गहू लाल शिक्क्यातील पोत्यात साठवलेला तर ओला गहू काळ्या शिक्क्यातील लागलेल्या पोत्यात साठवलेला होता. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी या निकृष्ट गव्हाचे नमुने तपासून याचे वितरण थांबवावे व चांगल्या गव्हाचा पुरवठा लाभार्थ्यांंना करावा, अशी मागणी लाभार्थ्यांंंकडून होत आहे. तसेच काळ्या ओल्या बुरशीयुक्त गव्हाचे वितरण करणार्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.