नियमबाह्य स्थायी समित्यांची निवड रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:52+5:302021-02-05T08:33:52+5:30

देऊळगाव राजा: स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान बहुमत असलेल्या गटनेत्याला मान्यता न देता पूर्वीच्या गटनेत्याला ग्राह्य धरून नियमबाह्य ...

Disqualify Standing Committees outside the rules | नियमबाह्य स्थायी समित्यांची निवड रद्द करा

नियमबाह्य स्थायी समित्यांची निवड रद्द करा

देऊळगाव राजा: स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान बहुमत असलेल्या गटनेत्याला मान्यता न देता पूर्वीच्या गटनेत्याला ग्राह्य धरून नियमबाह्य पद्धतीने झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करावी. तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजपच्या गटनेत्या शारदा जायभाये यांनी पत्रकार परिषदेतून केली.

नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रामदास शिंदे, तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे, शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, भाजप गटनेत्या शारदा जायभाये, नगरसेविका पल्लवी वाजपे, मल्हार वाजपे, मालनबी, सुधाकर जायभाये, सलीम खान, निशिकांत भावसार, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे आदींची उपस्थिती होती. गुरुवारी नगरपालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी बहुमताने शारदा जायभाये यांना गटनेतापदी निवडले होते. तत्पूर्वी पालिकेच्या मुख्याधिकारी यांना १९ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे नवीन गटनेता निवडी संदर्भात पत्र देऊन अवगत केले होते. तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनाही एका पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते अशी माहिती पत्रकार परिषदेत शारदा जायभाये यांनी दिली. दरम्यान, पालिका मुख्याधिकारी यांनी भाजपच्या पूर्वीच्या गटनेत्या विमल माळोदे व नव्याने निवडण्यात आलेल्या भाजपच्या गटनेत्या जायभाये यांच्यात गटनेता म्हणून कुणाला मान्यता द्यायची आहे. याबाबत मार्गदर्शन मागितले मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कुठले पत्र पालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिले नाही. स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान पीठासीन अधिकारी यांच्यासमोर जायभाये यांनी गटनेता पदावर दावा करीत बहुमत असलेले पत्र दिले. मात्र, त्यांना गटनेता म्हणून सभागृहात मान्यता दिली नाही असा आरोप करीत शारदा जायभाये यांनी गुरुवारी निवड झालेल्या नवनिर्वाचित सभापती पदे रद्द करून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी भाजपच्या गटनेत्यांनी बुलडाणा नगरपरिषदेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ऐन वेळेवर एकच गटनेता निवडला व येथील पीठासीन अधिकारी यांनी त्यांना मान्यता दिल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

फोटो: देऊळगाव राजा- पत्रकार परिषदेत संवाद साधताना भाजप नगरसेवक.

-----------

Web Title: Disqualify Standing Committees outside the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.