अपंग घरकुल लाभापासून वंचित !

By Admin | Updated: April 7, 2015 01:52 IST2015-04-07T01:52:08+5:302015-04-07T01:52:08+5:30

परवड अपंगांची; केंद्राचा आदेश असतानाही केली जाते टाळाटाळ.

Disabled crippled beneficiary! | अपंग घरकुल लाभापासून वंचित !

अपंग घरकुल लाभापासून वंचित !

सुहास वाघमारे / नांदुरा(जि. बुलडाणा): दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना हक्काचे घरकुल देणार्‍या इंदिरा आवास योजनेंतर्गत मानसिक व शारीरिक अपंगत्व असणार्‍याला घरकुल देण्याबाबत केंद्र शासनाचे स्पष्ट दिशानिर्देश असतानाही प्रत्यक्षात मात्र अपंगांना या योजनेंतर्गत लाभ दिला जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत आता राज्य शासनाने नवीन आदेश काढून इंदिरा आवास योजनेंतर्गत वंचित अपंगाची प्रतीक्षा यादी तयार करून त्यांना घरकुल देण्याची मागणी अपंग वर्गातून होत आहे. अपंगांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी इंदिरा आवास योजना कार्यान्वित करण्यासाठी केंद्र शासनाने दिशानिर्देश दिले आहेत. त्यामध्ये मानसिक व शारीरिक अपंगत्व ज्यांच्यामध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत; मात्र याबाबत राज्य शासन व प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना प्राधान्य या योजनेत दिल्या जात नाही. केंद्र शासनाने सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी जे दिशानिर्देश दिले आहेत, त्यामध्ये विधवा, परित्यक्ता तथा कठीण परिस्थितीत जीवन जगणार्‍या महिला, मानसिक व शारीरिक चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणारे अपंग व सशस्त्र कारवाईत जीव गमावलेल्या सैनिक व पोलीस यांना इंदिरा आवास योजनेत घरकुल देताना प्राधान्य देण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हय़ात याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने काढलेल्या ८ डिसेंबरच्या मागील वर्षाच्या पत्रात सशस्त्र कारवाईत वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी व जवळच्या नातेवाइकांना ते बीपीएल कार्डधारक नसतानाही इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या व त्याकरिता केंद्र शासनाच्या दिशानिर्देशाचा दाखला दिला. त्याच ६ डिसेंबरच्या पत्रात अपंगांनाही घरकुल देण्याबाबत नमूद केले आहे; मात्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या आदेशात अपंगांना घरकुल देण्याबाबतची सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे केंद्राचे आदेश असतानाही अपंगांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास योजनेच्या आदेशासोबत केंद्राच्या दिशानिर्देशाचे पत्र देण्यात आले. त्यामध्ये अपंगांना घरकुल देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांच्या अज्ञानामुळे व हलगर्जीपणामुळे अपंगांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: Disabled crippled beneficiary!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.